शेजलच्या संघर्षाची प्रेरणादायी यशोगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2017 12:22 AM2017-06-08T00:22:51+5:302017-06-08T00:22:51+5:30

चवथीमध्ये दुर्धर आजाराने पितृछत्र हरविले तर दहावीत असताना कुटुंबाचा आधारवड असलेले वयोवृद्ध आजोबाही इहलोकी गेले.

Inspirational success story of Shezel struggle | शेजलच्या संघर्षाची प्रेरणादायी यशोगाथा

शेजलच्या संघर्षाची प्रेरणादायी यशोगाथा

Next

लोकमत शुभवर्तमान : जिद्दीच्या बळावर खेचून आणले यश
दिनेश भुरे। लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर : चवथीमध्ये दुर्धर आजाराने पितृछत्र हरविले तर दहावीत असताना कुटुंबाचा आधारवड असलेले वयोवृद्ध आजोबाही इहलोकी गेले. घरात उरले ते विधवा आई व आजी, मोठी बहिण आणि पुरुष म्हणायला आठव्या वर्गात शिकणारा लहान भाऊ. ही गोष्ट आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत दहाव्या वर्गात ९५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या शहापूर येथील शेजल संदिप उके या गुणवंत विद्यार्थिनीची.
अख्खं कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जगत असताना अगदी लहानपणी पितृछत्र हरविलेल्या शेजल नाऊमेद न होता केवळ जिद्दीच्या बळावर कोणताही शिकवणी वर्ग न लावता प्रचंड मेहनत व नियोजनबद्ध अभ्यासाने शेजलने हे यश मिळविले आहे. ती भंडारा जिल्ह्यात सीबीएसई शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी असणाऱ्या व दहावीच्या परीक्षेत सतत अव्वल ठरणाऱ्या उमरी (भंडारा) येथील महर्षी विद्या मंदिरची विद्यार्थिनी आहे.
आर्थिक विवंचनेत जगणाऱ्या शेजलच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह वडिलाने लावलेल्या व आता आई व आजी चालवत असणाऱ्या पोहा विक्री दुकानावर अवलंबून आहे. मात्र या दुकानाची सर्वात जास्त काळजी असते ती शेजलला. सकाळी चार वाजता उठून एक तास अभ्यास झाल्यानंतर ठीक पाच वाजता सात वाजतापर्यंत आजीला पोहा विक्रीच्या दुकानाची मांडणी करून देणे, पिण्याच्या पाण्याचा भरणा करणे हा तिचा नित्यक्रम. याच अवधीत आपल्या शाळेची तयारी केल्यानंतर आईने तयार केलेला जेवणाचा डब्बा घेऊन आजीच्या दुकानाजवळ बसची वाट बघत असताना दुकानातील कामे करणे हा तिचा नित्यक्रम.
सुटीच्या दिवशी अधिक वेळ दुकानात देवून सुद्धा तिने आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. दहावीत असल्याची चिंता दुकानातील कामे करताना तिच्या चेहऱ्यावर नसायची. तिची मोठी बहिण सुद्धा दहावीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती. ती सध्या रामटेक येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.ई. द्वितीय वर्षात शिकत आहे. लहान भाऊ आठव्या वर्गात आहे.
सदर प्रतिनिधीने तिची भेट घेतली तेव्हा शेजलने आपल्या नियोजनबद्ध अभ्यासाची पद्धत सांगितली.
आपल्या या यशात महर्षी विद्या मंदिरच्या प्राचार्या श्रुती ओहळे यांच्या मार्गदर्शनाचा आवर्जून उल्लेख केला. तिच्यासोबत चर्चा सुरु असताना मात्र तिच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. अबोल चेहऱ्यानीच त्यांनी चर्चेत सहभाग घेतला. कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता शेजलने मिळविलेले नेत्रदिपक यश म्हणजे जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी घालण्याची किमया केली. तिच्या या कर्तृत्वाला सलाम.

Web Title: Inspirational success story of Shezel struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.