उड्डाणपुलावर चार जिने, स्ट्रीट लाइट लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:51+5:302021-07-23T04:21:51+5:30
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. परंतु येथील उड्डाणपुलाला वर चढण्याकरिता केवळ एकाच ...
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. परंतु येथील उड्डाणपुलाला वर चढण्याकरिता केवळ एकाच जिन्याचे बांधकाम करण्यात आले. नागरिकांच्या सोयीकरिता येथे चार जिन्याचे बांधकाम करणे गरजेचे आहे. तसेच उड्डाणपुलावर रात्री अंधाराचे साम्राज्य राहते. त्यामुळे उड्डाणपुलावर स्ट्रीट लाइटची व्यवस्था करण्यात यावी. उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही येथे स्ट्रीट लाइटचे खांब अजूनपर्यंत लावण्यात आले नाही. त्यामुळे उड्डाणपूल हा अंधारातच राहणार काय? असा प्रश्न येथे पडला आहे. उड्डाणपुलावर अंधार राहत असल्याने असामाजिक तत्त्वाचा त्रास येथे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता व जागतिक बँक प्रकल्प नागपूर यांना वारंवार निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या दिवशी निषेध म्हणून काळे झेंडे दाखवण्यात येतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तहसीलदारांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते इरफान शेर अली सय्यद, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बिरणवारे, अंकुश साठवणे, खुशाल नागपुरे, देवदास मेश्राम, शरणमदास नागदेवे उपस्थित होते.