झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:40 AM2021-09-15T04:40:45+5:302021-09-15T04:40:45+5:30
भंडारा : कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीनची लागवड जिल्ह्यातील अनेक शेतकरी करू लागले ...
भंडारा : कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीनची लागवड जिल्ह्यातील अनेक शेतकरी करू लागले आहेत. जिल्ह्यात यावर्षी ७१४ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जिल्ह्याचे प्रमुख पीक धान असले तरीही सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. तेलाचे वाढलेले अतोनात दरामुळे सोयाबीनची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्यातरी सोयाबीनला अकरा हजार रुपयांचा विक्रमी दर मिळत आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात नवीन सोयाबीनला ११००० हजार रुपयांचा विक्रती दर मिळाला आहे. राज्यातील परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर, विदर्भातील नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा जिल्ह्यात सोयाबीनचे पीक घेतले जाते. सोयाबीनला दोन फवारणी केल्यास व वेळेवर पाऊस कमी पडला तरीदेखील अपेक्षित उत्पन्न हाती येते. सध्या सोयाबीनला असलेल्या अकरा हजार रुपयांच्या दरामुळे शेतकरी मालामाल होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोट
आमचे गाव नागपूर जिल्ह्याला लागून असल्यामुळे आजही अनेक शेतकरी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात करतात. सोयाबीनला यावर्षी चांगला दर असल्यामुळे मीही सोयाबीनचे क्षेत्र वाढवले आहे. मात्र असाच पाऊस पडत राहिल्यास सोयाबीनचे नुकसान होऊ शकते. सोयाबीनचा ११ हजार रुपयांचा दर कायमस्वरूपी राहावा अशी आमची मागणी आहे.
विष्णूदास हटवार, शेतकरी, चिखली
मी गेल्या दहा वर्षांपासून सोयाबीन पेरतो आहे. मात्र यावर्षी इतका सोयाबीनला कधीच दर मिळाला नाही. अकरा हजार रुपयांचा दर मिळत असल्याने अनेक शेतकरी सोयाबीनकडे वळतील.
कोट
कृषी अधिकारी
खरीप हंगामाच्या सुरवातीला जिल्ह्यात रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी करावी यासाठी जिल्हाभरात कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली आहे. सध्या सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. कमी कालावधीत जास्त नफा देणारे असे सोयाबीन फायदेशीर पीक आहे.
हिंदुराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा
बॉक्स
झटपट येणारे सोयाबीन जेएस ९३ झिरो पाच हे वाण ९० ते ९५ दिवसात परिपक्व होते. यासोबतच जेएस २०, ३४ हे वाण ८६ दिवसात परिपक्व होत असल्याने काढणीला येते.
बॉक्स .
मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन
एमएयूएस ७१ हे वाण ९३ ते १०० दिवसात परिपक्व होत असून याचे हेक्टरी उत्पादन २८ ते ३० क्विंटलपर्यंत होते. त्याच्या फुलांचा रंग हा जांभळा असतो.
बॉक्स .
जास्त कालावधीत येणारे सोयाबीन
जेएस ९७ हे वाण ९८ ते १०५ दिवसांचे आहे. यासोबतच एनआरसी ३७ हे वाण १०५ ते १०७ दिवसांचे आहे. याचे उत्पादन हेक्टरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत होते. या सोयाबीनच्या दाण्याचे वजन दहा ते अकरा ग्रॅम असते. पेरणीकरिता ६० ते ६५ किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते.