स्वच्छंद मैदानी खेळांऐवजी बालकांच्या हाती आला स्मार्टफोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:00 AM2019-11-14T06:00:00+5:302019-11-14T06:00:44+5:30
मोबाईलचे वेड एवढे वाढले आहे की, मुले आपले पालक घरी येण्याची तासन्तास प्रतीक्षा करीत असतात. वडील अथवा आई घरी आल्याच्या आनंदापेक्षा मोबाईल आपल्या हातात आला याचाच अधिक आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. अनेक पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आल्याचे दिसत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तीन दशकापूर्वीचा काळ आठवा. गावातील मैदान मुलांनी फुलून गेलेले असायचे. कबड्डी, हुतूतू, विटीदांडू असे खेळ रंगलेले असायचे. स्वच्छंद मैदानी खेळात बालपण रमून जायचे. मात्र अलिकडे आधुनिक तंत्रज्ञानात क्रांती झाली. प्रत्येकाच्या घरी स्मार्टफोन आला. नकळत चिमुकल्यांनी मोबाईलचा ताबा घेतला आणि अख्खे बालपणच हरवून गेले. मुलांना मोबाईलचे एवढे वेड लागले की, आता त्यांच्यापुढे पालकांनीही हात टेकले आहे.
‘रम्य ते बालपण’ असे म्हटले जाते. बालपणीच्या आठवणीत रमायला प्रत्येकालाच आवडते. तीन दशकापूर्वी विद्यार्थी आणि मैदानाचे नाते अतूट होते. शाळा सुटली की, मैदान गाठायचे. मनसोक्त खेळायचे आणि सायंकाळीच घरी परतायचे, असा दिनक्रम असायचा. गावातील असो की, शहरातील मैदान बालकांनी गजबजून गेलेले असायचे.
आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र होत आहे. संवादाचे माध्यम असलेला मोबाईल स्मार्ट झाला. चैनीची वस्तू असलेला मोबाईल प्रत्येकाची गरज झाला आहे. त्यामुळेच गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाच्या हातात आता फोन दिसत आहे. या फोनने जीवन सुखकर होत असले तरी त्याच्या दुष्परिणामांचाही तेवढाच सामना करावा लागत आहे. सर्वप्रथम शालेय विद्यार्थी मोबाईलच्या जाळ्यात अडकले. तासन्तास मोबाईलमध्ये अडकलेले विद्यार्थी कुठेही दिसून येतील. विद्यार्थीच काय शाळेत न जाणारे तीन चार वर्षाचे चिमुकलेही आता मोबाईलसाठी रडताना घरात दिसून येतात. मला जेवढे मोबाईलमधले कळत नाही त्यापेक्षा अधिक आमच्या मुलाला कळते असे अभिमानाने सांगायचे, परंतु आता मुलं अभ्यासापेक्षा मोबाईलमध्येच जास्त वेळ घालवत असल्याने पालकांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत.
मोबाईलचे वेड एवढे वाढले आहे की, मुले आपले पालक घरी येण्याची तासन्तास प्रतीक्षा करीत असतात. वडील अथवा आई घरी आल्याच्या आनंदापेक्षा मोबाईल आपल्या हातात आला याचाच अधिक आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. अनेक पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आल्याचे दिसत नाही. उलट अनेक पालक आपल्या मुलांना मैदानावर खेळायला जाण्यास मज्जाव करीत असल्याचे दिसत आहे.
आधुनिक पिढीही टेक्नोसॅव्ही झाली आहे. कोणतीही गोष्ट झटपट करण्याकडे त्यांचा कल असतो. मात्र हे तंत्रज्ञान आता विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. अनेकांना डोळ्याच्या आजारासह विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अभ्यासात मुले माघारात असल्याच्याही तक्रारीत वाढ झाल्याचे दिसत आहे. मोबाईलने संपूर्ण बालपणच हिरावून घेतल्याचे सध्यातरी घराघरात चित्र आहे.