संस्था एक अध्यक्ष मात्र दोन
By admin | Published: June 19, 2017 12:31 AM2017-06-19T00:31:54+5:302017-06-19T00:31:54+5:30
येथील विवेकानंद विद्याभवन कनिष्ठ महाविद्यालयातील संस्था सदस्यांच्या वादामुळे शाळेतील सर्व कार्यालयातील कामकाज ठप्प आहे.
विवेकानंद संस्थेचे प्रकरण : विद्यार्थी, शाळेची स्थिती चिंताजनक
विशाल रणदिवे । लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : येथील विवेकानंद विद्याभवन कनिष्ठ महाविद्यालयातील संस्था सदस्यांच्या वादामुळे शाळेतील सर्व कार्यालयातील कामकाज ठप्प आहे. संस्थेच्या वादामुळे येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी मात्र अडचणीत आले आहेत.
गेल्या १ जूनपासून या शाळेतील ताले दोन तीनदा बदलले. त्यामुळे शाळेतील कार्यालयातील कामे बंद आहेत. शाळेची स्थापना सन १९६६ मध्ये झाली. परंतु एवढी वर्षे सुरळीत चालणारी आणि चालवणारी मंडळी मध्ये असे काय झाले की ज्या शाळेतील शिक्षक विद्यार्थी शोधायचे आधी आता मात्र विद्यार्थ्यांना आपले दाखले मिळविण्यासाठी शाळेतील कर्मचारी व शिक्षक यांना शोधावे लागत आहे. या शाळेतील प्रकार पाहून पालकांना सुद्धा याचा त्रास होत आहे. कारण संस्थेतील वाद आहे. तो शाळेच्या आवारात आला आहे आणि यामुळे अड्याळमधील गल्लोगल्लीत याच शाळेच्या चर्चा सुरु आहेत.
माहितीनुसार मुख्याध्यापक व्ही.एस. जगनाडे यांना १३ मे ला संस्था सचिव यांच्या सही व शिक्क्यानिशी निलंबन आदेश देण्यात आला. तेव्हापासून या शाळेचे वातावरण तापले ते आजपावेतो थंड झालेच नाही. महत्वाचे म्हणजे अनुसूची १ अन्वये सत्यवान आजबले अध्यक्ष असल्याचे बोलले जाते. परंतु डॉ.हर्षवर्धन कोहपरे सुद्धा मीच कार्यरत अध्यक्ष असल्याचे सांगतात. म्हणजे संस्था एक, अध्यक्ष दोन. असा प्रकार येथे बघायला मिळत आहे.
दोघांच्याही मतानुसार विद्यार्थी, शाळा या विषयीचा शाब्दीक जिव्हाळा दिसून येतो. मात्र, शाळेचे कार्यालयीन कामकाज बंद आहेत. महत्वाचे म्हणजे १० वी १२ वी चा निकाल लागल्यासून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी दाखले या शाळांतून मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मते तुमचे वाद विवाद काय आहेत ते तुम्ही पाहा. परंतु तुमच्या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये असाही सूर आता पालकवर्गात दिसत आहे. अशा वातावरणामध्ये शाळेतील विद्यार्थी तसेच पालक वर्ग चिंताग्रस्त आहेत.
संस्थेच्या घटनेच्या कलम ११ अन्वये सचिवाला निकाल संरक्षण, नियुक्ती, रद्दबादल करणे, डिसमीस करणेअसे कोणत्याही प्रकारचे अधिकार नसून फक्त लेखाजोखा सांभाळण्याचे अधिकार आहेत. मात्र अध्यक्षाला घटनेच्या कलम ९ नुसार ते अधिकार आहेत.
-सत्यवान आजबले
मला दिलेले निलंबनाचे पत्र हे बेकायदेशिर आहे. टेंभुर्णे व कोहपरे यांनी शाळेतील लॉक तोडले व दुसरे लावले आहेत. त्यादिवशीपासून शालेय कामकाज ठप्प आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे.
-व्ही.एस. जगनाडे
जानेवारी २०१७ ला धर्मदाय आयुक्त भंडारा यांच्याकडे जो बदल अर्ज सादर केला, त्या अनुषंगाने मी या संस्थेचा अध्यक्ष आहे. २५ नोव्हेंबर २०१६ ला निवडणूक झाली. तेव्हापासून मी अध्यक्ष आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
-डॉ.हर्षवर्धन कोहपरे