संस्थांना संविधान सप्ताह साजरा करण्याचे निर्देश द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 09:41 PM2018-11-25T21:41:23+5:302018-11-25T21:42:44+5:30
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था व शैक्षणिक संस्था आदींना २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत संविधान सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था व शैक्षणिक संस्था आदींना २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत संविधान सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार भारतीय संविधान हे राष्ट्रीय एकता एकात्मता व बंधूत्वतेचे तसेच देशाच्या संपन्नतेचे अत्यंत सुंदर व सक्षम असे संविधान आहे. तो भारतीयांचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. समाजाला सन्मानाने जगण्याचे व जगविण्याचे मौलीक अधिकार संविधानात आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून केंद्र सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्णयानुसार २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत राज्यात संविधान सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागृती होण्याच्या दृष्टीकोनातून भंडारा जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती तसेच शैक्षणिक संस्थांना संविधान दिन व संविधान सप्ताह साजरा करण्याच्या सूचना व निर्देश देण्यात यावे अशी मागणी आहे.
शिष्टमंडळात महासंघाचे केंद्रीय ज्येष्ठ उपाध्यक्ष अमृत बन्सोड, जिल्हाध्यक्ष गुलशन गजभिये, ज्येष्ठ उपाध्यक्ष अदिनाथ नागदेवे, सचिव नरेंद्र बन्सोड, मुख्य संघटन सचिव रुपचंद रामटेके, मोरेश्वर गेडाम, आनंद गजभिये, उपेंद्र कांबळे, अशोक बन्सोड आदींचा सहभाग होता.