‘त्या’ महिलेला नुकसानभरपाई देण्याचे निर्देश
By admin | Published: May 5, 2016 12:52 AM2016-05-05T00:52:07+5:302016-05-05T00:52:07+5:30
नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आष्टी उपकेंद्रात गर्भवती महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली.
प्रकरण गर्भवती महिलेच्या शस्त्रक्रियेचे : जिल्हास्तरीय वैद्यकीय समितीने दिला निर्णय
मोहन भोयर तुमसर
नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आष्टी उपकेंद्रात गर्भवती महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. तक्रारीनंतर जिल्हास्तरीय वैद्यकीय समितीपुढे या प्रकरणाची ३ मे रोजी चौकशी झाली. समितीने ३० हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला. शस्त्रक्रियेनंतर गर्भधारणा झाली तर शासनाकडून ३० हजाराची नुकसान भरपाई देण्यात येते. या प्रकरणात गर्भवती महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे हा नियम लागू होत नाही, अशी भूमिका तक्रारकर्त्यांनी घेतला असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आष्टी येथील श्यामकला भागवत गौपाले (२५) यांची आष्टी आरोग्य उपकेंद्रात २६ आॅगस्ट २०१५ ला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी श्यामकला यांची गर्भविषयक चाचणी निगेटिव्ह आल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. १० ते १२ दिल्यानंतर त्यांच्या पोटात दुखणे सुरू झाले. तुमसर रूग्णालयात तपासणी केल्यावर त्या गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. २९ एप्रिल रोजी आष्टी येथील उपकेंद्रात श्यामकलाची प्रसुती झाली. यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयात दुपारी ४ नंतर जिल्हास्तरीय वैद्यकीय समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, भूलतज्ज्ञ, प्रसूतितज्ज्ञांचा समावेश होता. या समितीपुढे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांनी चौकशीचा अहवाल सादर केला.
या समितीसमोर तुमसर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एम.ए. कुरैशी, डॉ.वनश्री गिरीपुंजे व संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. वैद्यकीय समितीने या प्रकरणात शासन नियमानुसार ३० हजारांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला. या प्रकरणात गर्भवती महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे येथे संबंधित डॉक्टरविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले यांनी केली आहे.
शस्त्रक्रियेपूर्वीची गर्भधारणा तपासणी निगेटीव्ह आल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेपूर्वी सर्व कागदपत्रांचा सोपस्कार पार पाडण्यात येतो. चौकशी समितीने प्रत्येक बिंदूचा अभ्यास केला असून नियमानुसार नुकसानभरपाई देण्याचा निर्णय दिला आहे.
- डॉ.विजय डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.
या प्रकरणातील डॉक्टरावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे. येथे गर्भवती महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर गर्भधारणेचा नियम लागू होत नाही. आंदोलन उभारण्यात येईल.
- शिशुपाल गौपाले, पं.स. सदस्य, आष्टी
स्वत: शस्त्रक्रिया केली व स्वत:चा चौकशीचा अहवाल स्वत:च तयार करून सभागृहासमोर सादर केला. ३० हजाराची नुकसानभरपाई देऊन तोंड बंद करण्याचा हा प्रकार खपवून घेणार नाही.
- हिरालाल नागपुरे, गटनेता, पं.स. तुमसर.
शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरकडेच चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडविकास अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे या प्रकरणाला प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. उच्चस्तरीय चौकशीची मागणी आरोग्यमंत्र्यांकडे करणार आहे.
- शेखर कोतपल्लीवार, उपसभापती, पं.स. तुमसर.