वन्यप्राण्यांच्या सुरक्षेकरिता वाहने हळू चालविण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:34 AM2021-03-16T04:34:51+5:302021-03-16T04:34:51+5:30
तुमसर : नाकाडोंगरी वन परिक्षेत्रातून तुमसर कटंगी आंतर राज्य महामार्ग जातो. हा संपूर्ण परिसर सातपुडा पर्वत रांगेत येतो. महामार्गाच्या ...
तुमसर : नाकाडोंगरी वन परिक्षेत्रातून तुमसर कटंगी आंतर राज्य महामार्ग जातो. हा संपूर्ण परिसर सातपुडा पर्वत रांगेत येतो. महामार्गाच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. या जंगलात वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, अशा सूचना महामार्गावरील रस्त्यावर लावण्यात आल्या आहेत.
नाकाडोंगरी वन परिक्षेत्र हा घनदाट जंगल म्हणून प्रसिद्ध आहे. या जंगलातून तुमसर कटंगी हा अंतर राज्य महामार्ग जातो चिंचोलीपासून तर गोबरवाहीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. या जंगलात वाघ, रानडुक्कर, सांबर, हरिण, चितळ, कोल्हे, अस्वल, ससे, रानकुत्रे इत्यादी वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. चिंचोली ते गोबरवाही या सहा ते सात किलोमीटर अंतरापर्यंत रस्ता जंगलातून जातो.
रस्ता ओलांडताना वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात येऊ नये, याकरिता वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्याच्या सूचना नाका डोंगरी वन परिक्षेत्रात रस्त्याच्या शेजारी लावण्यात आले आहेत. वाहनधारकांना येथे वाहने हळू चालवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच जंगलातून जाताना हॉर्नचा वापर टाळावा, अशा सूचना फलकावर लिहिलेल्या आहेत.
बॉक्स
पर्यटनाचा विकास नाही
तुमसर तालुक्यात नाका डोंगरीवर लेंडेझरी वन परिक्षेत्र येते. या दोन्ही जंगलांचा मोठा भाग राखीव व घनदाट जंगलात मोडतो. येथे वन्यप्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परंतु पर्यटनाचा विकास झालेला नाही. लेंडेझरी मार्ग नागपूरकडे जातो. या परिसरात बावनथडी प्रकल्प आहे. निसर्गरम्य स्थळ असल्यामुळे पर्यटकांना हे क्षेत्र आकर्षित करते. परंतु अजूनपर्यंत पर्यटनाचा विकास झाला नाही. शासनाने पर्यटनस्थळाचा विकास केला तर स्थानिक बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल. या जंगलात अनेक वनस्पती, औषधी गुणयुक्त झाडे आहेत. त्यांचा अभ्यास करण्याकरिता विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.