३६ हजार हेक्टरवरील पिकांचा उतरविला विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:55 AM2019-08-01T00:55:39+5:302019-08-01T00:56:08+5:30
संतोष जाधवर। लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सुमारे ९० हजार २४२ शेतकऱ्यांनी ...
संतोष जाधवर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सुमारे ९० हजार २४२ शेतकऱ्यांनी ३६ हजार ५६ हेक्टर पिकांचा विमा उतरविला असून दोन कोटी ८३ लाख ७०१ रुपयांचा विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरला आहे. यावर्षी पावसाने सुरुवातीलाच दडी मारल्याने कर्जदार आणि बिगर कर्जदार सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा काढला आहे.
भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक भात क्षेत्र आहे. यावर्षी सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने दुष्काळदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत ३१ जुलै पर्यंत रोवणी न झाल्यास विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के विमा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा उतरविला आहे. शासनाने पीक विम्याची मुदत ३१ जुलै पर्यंत वाढवून दिल्याने अनेक शेतकऱ्यांना यात सहभागी होता आले. ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत आॅनलाईन पीक विमा काढता येणार असल्याने शेतकºयांची संख्या आणि कृषी क्षेत्र वाढणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
विमा संरक्षण कोणाला?
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार.
24 जुलै ही पीकविमा भरण्याची अंतिम मुदत होती. पण, यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी, पोर्टलमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या त्रुटी आणि बँकानी पीकविमा भरून घेण्यास होत असलेला विलंब यामुळे सेतु सुविधा केंद्रावर होणारी शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन २९ जुलैपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली.
विमा हप्ता किती?
खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के तर नगदी पिकांकरिता ५ टक्के हप्ता शेतकºयांना भरावा लागणार आहे.