एक रुपयात विमा, तरी शेतकऱ्यांनी का फिरवली पाठ ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 03:50 PM2024-07-23T15:50:55+5:302024-07-23T15:52:54+5:30
३१ जुलैपर्यंत मुदतवाढ : पीक विमा उतरविण्याची शेतकऱ्यांना मिळाली संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र शासनाने गेल्या वर्षीपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात पीक विमा उतरण्याची सुविधा उपलब्ध करून दिले आहे. मात्र, शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळत नसल्याने आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची गर्दी झाल्याने शेतकऱ्यांना अर्ज भरण्यात अडचणी यायला लागल्या. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाठ फिरविल्याची परिस्थिती दिसून येत आहे. आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना विमा उतरविण्याची संधी मिळाली आहे.
शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी, तसेच पिकांना संरक्षण मिळावे, याकरिता शासनाने एक रुपयात पीक विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याकरिता १५ जुलैपर्यंत मुदत दिली होती; परंतु याच कालावधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही सुरू करण्यात आल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता एकच गर्दी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यात अडचणी यायला लागल्याने शेतकऱ्यांनी अर्जच दाखल केले नाही. मुदतवाढीची मागणी केल्यावर शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
७९,२३३ शेतकऱ्यांनी भरला विमा
यावर्षी खरीप हंगामात आतापर्यंत एकूण ७९ हजार २३३ शेतकऱ्यांनीच पीक विमा उतरविला आहे. विम्यासाठी अर्ज संख्या १,७९,१७८ इतकी आहे. ही संख्या १९ जुलैपर्यंतची असून, येत्या ३१ जुलैपर्यंत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
८६,६५९ हेक्टरचा काढला विमा
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६ हजार ६५९ हेक्टरचा पीक विमा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पिकांना संरक्षण मिळाले आहे. शासनाने आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने विमा संरक्षित क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
१,१८,०९६ शेतकऱ्यांनी भरला होता विमा
मागील वर्षी शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा काढण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने १,१८,०९६ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार ५११ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केले होते.
विमा एक रुपयात, कागदपत्रासाठी चारशे रुपयांचा खर्च
शासनाने एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे; पण त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. त्याकरिता किमान ४०० रुपयांपर्यंत खर्च येत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असून, गावात नेटवर्कच्या अडचणी कायम आहेत. त्यांना अर्ज भरण्याकरिता तालुक्याला जावे लागते.
का घटली शेतकऱ्यांची संख्या?
पीकविमा उतरवूनही शेतकऱ्यांनी पिकांची नुकसान भरपाई मिळत नाही, अशी ओरड शेतकऱ्यांमध्ये आहेत. यामुळे शेतकरी यावर्षी पीकविमा उतरविण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही.
नुकतीच 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेचे अर्ज भरण्याकरिता महिलांची सेतू केंद्रावर मोठी गर्दी असल्याने पीकविमा काढण्याचे अर्ज मागे पडले आहे.
जिल्ह्यातील शेतकरी म्हणतात...
"शासनाने पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पीकविमा उतरविण्याकरिता सुरुवातीला १५ जुलैपर्यंतची मुदत दिली होती; परंतु याच कालावधीत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना सुरू झाल्याने सेतू केंद्रावर अर्ज भरण्याकरिता गर्दी झाली होती. शेतकऱ्यांना अर्जासाठी संधीच मिळत नव्हती."
- महादेव फुसे, शेतकरी.
"यावर्षी विविध योजनांचे अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीकविमा उतरविण्याकडे दुर्लक्ष झाले होते. मागील वर्षी पीकविमा उतरविला होता; परंतु त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत योजनेसंबंधी नाराजी आहे."
- सुरेंद्र बागडे, शेतकरी.
"सध्या जिल्ह्यात ७९ हजार २३३ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला असून अर्जाची संख्या १,७९,१७८ इतकी आहे. आतापर्यंत ८६ हजार ६५९ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरविण्यात आला आहे. मुदतवाढीमुळे यात आणखी वाढ होणार आहे. यापूर्वी योजनेसाठी १५ जुलैपर्यंत मुदत होती. आता शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. गतवर्षी इतकी नोंदणी होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत."
- संगिता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.