तृष्णा भागविण्याकरिता इंटकवेल
By admin | Published: April 6, 2017 12:20 AM2017-04-06T00:20:43+5:302017-04-06T00:20:43+5:30
तुमसरकरांची तृष्णा भागविण्याकरिता नगरपरिषद प्रशासनाने कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
तुमसर येथील प्रकार : अध्यक्ष तथा मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहणी
तुमसर : तुमसरकरांची तृष्णा भागविण्याकरिता नगरपरिषद प्रशासनाने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. मुबलक पाणी उपलब्ध व्हावे याकरिता कोष्टी घाटावर नगराध्यक्ष तथा मुख्याधिकाऱ्यांनी इंटकवेल करिता पाहणी केली.
शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता कोष्टी येथे नगरपरिषदेचे पंपहाऊस आहे. सध्या वैनगंगेचे पात्र कोरडे पडले आहे. पंप हाऊसकडे इंटकेवेल करून पाणी वळते करता येते नाही करिता कोष्टी येथे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे, पाणीपुरवठा सभापती मेहताब सिंग ठाकूर तथा तांत्रिक कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. यापूर्वी माडगी येथे इंटकवेल करून नदीपात्रातील पाणी वळते करण्यात आले होते.
नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी शहरवासीयांना मुबलक पाणी कसे मिळेल याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. शहरातील जलशुद्धीकरण केंद्र दुरूस्ती करण्याची निविदा काढली आहे. उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होते, परंतु समस्येवर तोडगा कसे काढता येईल, याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्ष पडोळे यांनी दिली.
राज्य शासनाला पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. राज्य शासनाची मंजूरी प्राप्त झाल्यावर भविष्यात पाणी संकट येथे नक्कीच दूर होईल. शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता वितरिका तयार करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी दिली.
माडगी तथा कोष्टी येथील पंपगृह परिसरात पाणीसाठा राहावा याकरिता इंटकवेल करण्यात येत आहे. येथील पंपगृहही अत्याधुनिक करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती मेहताब सिंग ठाकूर यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)