आंतरजिल्हा बदली शिक्षकांचा शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 10:34 PM2018-06-06T22:34:46+5:302018-06-06T22:34:58+5:30
अन्यायग्रस्त आंतरजिल्हा बदली कुटुंबियांनी शिक्षणाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासमोर बुधवारला ठिय्या आंदोलन केले. आज चौथ्या दिवशीही या शिक्षकांचे सहकुटुंब उपोषण सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अन्यायग्रस्त आंतरजिल्हा बदली कुटुंबियांनी शिक्षणाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासमोर बुधवारला ठिय्या आंदोलन केले. आज चौथ्या दिवशीही या शिक्षकांचे सहकुटुंब उपोषण सुरू आहे.
२३ नोव्हेंबर २०१६ ला जिल्हा परिषदेत ११७ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने सामावून घेण्यात आले. त्यामुळे अनेक पात्र शिक्षकांना वंचित राहावे लागले. याविरोधात अन्याय ग्रस्तांनी विभागीय आयुक्तांना न्यायासाठी पाठपुरावा केला. उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली.
या प्रकरणात तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी यांची भूमिका संशयास्पद असल्याने विभागीय आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव २८ आॅगस्ट २०१७ ला प्रधान सचिवांकडे पाठविला होता. अद्यापही त्यांचेवर कारवाई झालेली नाही. आता अन्यायग्रस्त बदलीपात्र शिक्षकांना सहकुटुंब उन्हात आमरण उपोषण करण्यासाठी प्रशासनाने भाग पाडल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
४ जूनपासून ३ दिवस होऊनही जिल्हा परिषद प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे प्रहारचे जिल्हाध्यक्ष राजेश पाखमोडे, तालुका अध्यक्ष मंगेश वंजारी यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त शिक्षकांच्या कुटुंबियांनी शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आता आमदार बच्चू कडू यांचेसोबत येत्या दोन दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय अन्यायग्रस्त शिक्षकांनी घेतला आहे.