आष्टीत चालतो आंतरराज्यीय जुगार अड्डा
By admin | Published: December 29, 2015 02:41 AM2015-12-29T02:41:44+5:302015-12-29T02:41:44+5:30
तुमसर तालुक्यातील आष्टी येथील एका शेतातील घरात सर्रास जुगाराचा अड्डा सुरू असून हा अड्डा टक्केवारीवर सुरू
तुमसर : तुमसर तालुक्यातील आष्टी येथील एका शेतातील घरात सर्रास जुगाराचा अड्डा सुरू असून हा अड्डा टक्केवारीवर सुरू आहे. येथे दररोज ३० ते ४० जुगार खेळणारे येतात. यात मध्यप्रदेशतील जुगाऱ्यांचाही समावेश आहे. या जुगाराची सर्वांना माहिती असली तरी पोलिसांकडून अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
तुमसर येथून ३० कि़मी. अंतरावर आष्टी हे गाव आहे. सदर गाव काही दिवसापासून जुगाराकरिता चर्चेत आहे. आष्टी-नाकाडोंगरी मार्गावर कालव्याच्या बाजुला एका शेतातील घरात जुगाराचा सर्रास अड्डा सुरू आहे. या जुगार अड्ड्यावर मध्यप्रदेशातील पिपरवानी, कटंगी, वाराशिवनी, गोंदिया तथा तुमसरातील ३० ते ४० जण येथे जुगार खेळतात. परिसरातील गावातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा येथे एक गट तयार झाला आहे. सदर जुगार अड्डा टक्केवारीवर सुरू आहे. जुगार अड्डा चालविणारे जुगाऱ्यांकडून प्रवेश शुल्क म्हणून ५०० ते हजार घेतात किंवा प्रत्येक खेळावर ५ टक्के घेतले जातात.
हा जुगार अड्डा सायंकाळी ४ ते ५ वाजता सुरू होऊन रात्री उशिरा ३ ते ४ पर्यंत सुरू असतो. येथे जुगार खेळणारे सामान्यत: व्यावसायिक असल्याने ते रात्री येतात. एकावेळी येथे सुमारे २० चारचाकी तथा २० ते ३० दुचाकी या जुगार अड्डयासमोर उभी असतात. या अड्यावर १० ते १२ लाखांची उलाढाल होते.
हा अड्डा चालविण्याला ५० ते ६० हजारांचा दररोज नफा मिळतो. यात जुगाऱ्यांना जुगार चालक फराळ, चहा व कधी कधी मेजवानी देतो. या मार्गावरील शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास होत आहे. काही दिवसापूर्वी ग्रामस्थांनी हा जुगार अड्डा बंद करण्याकरिता पुढाकार घेतला होता. परंतु त्यांना धमकाविण्यात आल्याने ग्रामस्थांनी सायंकाळी तिकडे फिरकणे बंद केले. या जुगार अड्यावर मध्यप्रदेशाच्या जुगाऱ्यांना लाभ पोहचविण्याची सेटींग येथे केली जाते. या जुगार अड्याला कुणाचे अभय आहे. भंडारा जिल्ह्याच्या तरूण कर्तव्यदक्ष महिला पोलीस जिल्हा अधीक्षकांनी येथे लक्ष देण्याची मागणी आष्टी येथील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
यापूर्वी आष्टी येथील जुगार अड्यावर धाड घालून कारवाई करण्यात आली. पाच दिवसापूर्वी आष्टी येथे धाड घातली असता तिथे काही जणांची ओली पार्टी सुरू होती. जुगार खेळणारे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. त्यावर आमची नजर आहे.
-मनोज वाढीवे,
ठाणेदार गोबरवाही.