आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारे अ.वा. बुद्धे गुरूजी
By Admin | Published: July 9, 2017 12:28 AM2017-07-09T00:28:09+5:302017-07-09T00:28:09+5:30
विद्यार्थी व शिक्षकांचे नाते केवळ पुस्तकापर्यंत मर्यादित नाही. एक साधा शिक्षक मनात ठरवून कामाला झपाटले तर क्रीडा प्रशिक्षकाला जे सहज साध्य होत नाही ते अत्यंत कठीण काम करू शकतो,...
गुरुपौर्णिमा विशेष : क्रीडा प्रबोधीनीत पाठविले ७० विद्यार्थी, शुल्क न घेता करतात मार्गदर्शन
राजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : विद्यार्थी व शिक्षकांचे नाते केवळ पुस्तकापर्यंत मर्यादित नाही. एक साधा शिक्षक मनात ठरवून कामाला झपाटले तर क्रीडा प्रशिक्षकाला जे सहज साध्य होत नाही ते अत्यंत कठीण काम करू शकतो, असे हिमालयाच्या उंचीचे काम करू शकतो. जिल्हा परिषद शाळेमधील एका साध्या शिक्षकांचा भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण मुलामुलींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यात सिंहाचा वाटा आहे. अ.वा. बुद्धे असे त्या शिक्षकाचे नाव आहे.
तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील ढोरवाडा येथील रहिवासी व सध्या मुंढरी येथे जि.प. प्राथमिक शाळेत नव्याने रूजू झालेले अ.वा. बुद्धे यांनी क्रीडा विभागाचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही परंतु खेळाप्रती त्यांची ओढ एखाद्या खेळाडू तथा तज्ञ क्रीडा प्रशिक्षकासारखी आहे. ग्रामीण भागात खेळात मोठी प्रतिभा आहे. परंतू त्यांना संधी उपलब्ध होत नाही अशी खंत अ.वा. बुद्धे यांना आहे. परंतु त्याला दोष न देता बुद्धे यांनी १५ वर्षापुर्वी पहाटे व सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांना देव्हाडी येथील बड्डा क्रीडांगणावर क्रीडा प्रशिक्षण देणे सुरू केले होते. स्व. फत्तु बावनकर यांच्या नावे क्रीडा अॅकेडमी त्यांनी सुरू केली होती. बेला येथील मयुरी लुटे ही दुसरी खेळाडू दिल्ली येथे क्रीडा प्राधीकरणात क्रीडा कौशल्य विकसीत करीत असून आशीयन क्रीडा स्पर्धेकरिता तिची निवड होण्याची शक्यता आहे. ज्यु. भारतीय हॉकी स्पर्धेतही भंडारा जिल्ह्यातल मुली संध्या खेळत आहेत. आजही अ.वा. बुद्धे विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेकरिता प्रोत्साहन देत असून क्रीडांगण हेच माझे विश्व आहे, असे मोठ्या अभिमानाने सांगतात. शासनाची कोणतीही मदतीविना व क्रीडा प्रशिक्षणाचे प्रशिक्षण न घेणारे अ.वा. बुद्धे खऱ्या अर्थाने हाडाचे शिक्षक आहेत. राज्य शासनाने अशा होतकरू शिक्षकाचा शासनाच्या क्रीडा समितीवर नियुक्ती करण्याची गरज आहे. येथे शासनाला त्यांचा विसर पडल्याचे दिसून येते. भंडारा जिल्हा परिषदेची मान उंचावणाऱ्या शिक्षणाला गुरू पोर्णिमेनिमित्त सलाम.