आंतरराज्यीय वनउपज तपासणी नाका मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:28 PM2018-10-15T22:28:27+5:302018-10-15T22:29:02+5:30
महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील बपेरा येथे वनविभागाच्या तपासणी नाक्यावर फाटकच नाही, मागील एका वर्षापासून फाटक तुटल्यानंतर ती लावण्यात आली नाही. आंतरराज्यीय मार्गावरून वाहने भरधाव जातात. या मार्गावर तस्करीचे प्रमाण अधिक आहे.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील बपेरा येथे वनविभागाच्या तपासणी नाक्यावर फाटकच नाही, मागील एका वर्षापासून फाटक तुटल्यानंतर ती लावण्यात आली नाही. आंतरराज्यीय मार्गावरून वाहने भरधाव जातात. या मार्गावर तस्करीचे प्रमाण अधिक आहे. वनविभागाच्या नाक्यावर कर्मचाऱ्यांच्या नियमित ड्युटी लावली जाते. परंतु ते फाटकाअभावी वाहने थांबून शकत नाही. दोन वर्षापासून मागणी नंतरही फाटक न लावणे हा संशोधनाचा विषय आहे.
भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकार बपेरा हे गाव असून गावाला लागूनच मध्यप्रदेशाची सीमा आहे. वनविभागाने राज्यसीमा वनउपज तपासणी नाका तयार केला परंतु फाटक बॅरीकेट तयार केले नाही, वन कर्मचारी तपासणी फाटक नसल्याने कोणत्याच वाहनाची तपासणी करू शकत नाही.
वनउपज तपासणी नाक्यापुढे राज्य पोलिसांची पोलीस चौकी आहे. रस्त्यावर बॅरीकेट आहेत, परंतु कर्तव्यावर पोलीस येथे दिसत नाही. वाहनांच्या तपासणी अभावी तस्करांकरिता येथे मोकळा रस्ता आहे.
तुमसर वनविभागाने केवळ कागदोपत्री वनउपज तपासणी नाका तयार केला. काही दिवस सुरळीत या नाक्यावर तपासणी सुद्धा करण्यात आली. मात्र एका वर्षापुर्वी तपासणी नाक्यावरील लोखंडी खांब तुटला. स्थानिक वन कर्मचारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना रितसर तक्रार वरिष्ठ अधिकाºयांकडे केली, परंतु मागील एक वर्षापासून याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून वाहने थांबवायची काय, असा उत्तर प्रश्न स्थानिक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.
या मार्गावरून मध्यप्रदेशातील बनावट दारू, चोरीची रेती वाहतूक, लाकडे, गांजा आदी महाराष्ट्राच्या सीमेत आणले जात आहे. येथे आंतरराज्यीय सीमेची सुरक्षा रामभरोसे आहे. आंतरराज्यीय सीमेकडे नक्षलग्रस्त सक्रीय आहे.