लीड कॉईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 04:52 PM2023-07-13T16:52:48+5:302023-07-13T16:53:28+5:30
डोंगरी खाण : सात तरुणांचा सहभाग, वर्षभरापासून एक जण होता फरार
तुमसर (भंडारा) : तालुक्यातील डोंगरी बुजुर्ग खाणीच्या ईएमडी प्लांटमध्ये शिरून लीड कॉईलची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून आरोपींना अटक करण्यात गोबरवाही पोलिसांना यश आले आहे. यात सात आरोपींना पकडण्यात आले.
राहुल अरुण झोडे (३५) रा. चिखला हल्ली, मुक्काम दमुआ, जि. छिंदवाडा, अमन अभिराम येदुवंशी (१९) रा. मांडई, जि. छिंदवाडा, राहुल मोहन साहिलवार (२३) रा. मॅगनीज दफाई, जि. छिंदवाडा, आशिष गुरुप्रसाद गोटे (२३) रा. पुराना दमुआ, जि. छिंदवाडा, विकास राजेश ठाकूर (२३) रा. पुराना दमुआ जि. छिंदवाडा , यशवंत उर्फ पाँध्या रामचंद्र सोनवाने (२४) रा. चिखला, ता. तुमसर आणि विक्की उर्फ विक्रम लक्ष्मीकांत कापगते (२४) रा. पाथरी, ता. तुमसर असे अटक करण्यात आलेल्या आंतरराज्यीय टोळीतल्या आरोपींची नावे आहेत.
चोरीचा माल विकत घेणारा व्यापारी दिलीप जगदीश सोनवाने (३०) रा. हरदोली, ता. तिरोडी, जि. बालाघाट यास अटक करून त्याच्या ताब्यातून चोरीस केलेल्या साहित्यापैकी २१० किलो लीड कॉईलच्या प्लेटा अंदाजे किंमत ४३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यांतील मुख्य आरोपी राहुल अरुण झोडे याने यापूर्वी चोरी केली होती. तो १ जून २०२२ पासून फरार होता हे विशेष. तपास गोबरवाही पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर करीत आहेत.
अशी घडली होती घटना
३० जून रोजी डोंगरी माइन्सचे सुरक्षारक्षक दिलीप सीताराम चौरसीया (५३) हे कर्तव्यावर असताना माइन्सचे ईएमडी प्लॅट क्षेत्रातून कुणीतरी अज्ञात चोरांनी एकूण ०४ लीड क्वाईल प्रत्येकी १२० किलोप्रमाणे एकूण ४८० किलो प्रत्येकी अंदाजे किंंमत २५ हजार रुपयेप्रमाणे एकूण किं.१ लाख रुपयांचा माल चोरीला गेला असल्याचे लक्षात आले. त्यांनी गोबरवाही पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता तपासी अंमलदार पोलिस नायक प्रवीण खोत, मंगेश पेदाम, पोलिस शिपाई रवि जायभाये, ईश्वर चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सातही आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखविला. त्यांनी लीड कॉईल चोरी केल्याची कबुली दिली. त्या मालाची विक्री कुणाकडे केली हेही सांगितले.