आंतरराज्यीय चोरट्यांना मुद्देमालासह १२ तासात अटक
By admin | Published: July 12, 2017 12:21 AM2017-07-12T00:21:26+5:302017-07-12T00:21:26+5:30
प्लॉस्टिक ड्रम विक्रीतून जमा झालेली १ लाख ३० हजार रूपयांची रक्कम ट्रक क्लिनरने चोरली.
कारधा पोलिसांची कारवाई : सिवनी व नागपुरातून घेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्लॉस्टिक ड्रम विक्रीतून जमा झालेली १ लाख ३० हजार रूपयांची रक्कम ट्रक क्लिनरने चोरली. याप्रकरणी मध्य प्रदेशातील क्लिनर व नागपूरच्या दोघांसह आंतरराज्यीय तीन चोरट्यांना कारधा पोलिसांनी १२ तासात अटक केली. या तिघांकडून १ लाख १४० रूपये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे.
अन्नू श्रीराम यादव (२५) रा.सिवनी मध्य प्रदेश, दिनेश किशनलाल परिहार (२१), सरजू पृथ्वीराज कोटांगळे (३१) रा.जरीपटका नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनाही पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. नागपूर येथील एका व्यावसायिकाने त्यांच्याकडील प्लॉस्टिक ड्रम ओरिसात विक्रीसाठी पाठविले होते. ट्रक (क्र.एमएच ४९ - ०१४६) मधून हे ड्रम चालक नरेंद्र बोरकर रा.नागपूर याने क्लिनर अन्नू यादवसह ओरिसात नेले. ड्रम विक्री करून पैसे आणण्याची जबाबदारी चालक बोरकर हा नेहमी इमानेइतबारे करीत होता. दरम्यान ही बाब क्लिनर अन्नूला माहीत होती. त्यामुळे ड्रम विक्रीची रक्कम चोरण्याचा बेत अन्नू, दिनेश व सरजू यांनी आखला. त्यानुसार हे तिघेही भ्रमणध्वनीच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. ड्रम विक्रीच्या १ लाख ३० हजार रूपयांसह चालक व क्लिनर परतीच्या मार्गावर असताना राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्यावर दोघांनी शनिवारच्या रात्री भोजन केले. त्यानंतर चालक नरेंद्र हा झोपी गेला. दरम्यान, अगोदरपासूनच दिनेश व सरजूच्या संपर्कातील अन्नूने ही बाब दोघांना सांगितली. त्यानुसार दोघेही दुचाकीने (एमएच ४९ एसी ९८०२) ढाब्यावर पोहचले. पहाटे ३ वाजताच्या सुमारास चालक नरेंद्र झोपलेला असल्याचे बघून अन्नूने ट्रक कॅबिनमध्ये ठेवलेली १ लाख ३० हजारांची रक्कम व चालकाचा मोबाईल घेऊन पळ काढला.
या घटनेची तक्रार चालक नरेंद्रने कारधा पोलिसात दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार ललिता तोडासे यांनी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले, पोलीस कर्मचारी रणधीर नवखरे, प्रवीण राठोड, दिनेश हटवार, मंगेश मालोदे यांचे एक पथक चोरट्याच्या शोधात पाठविले. क्लिनर अन्नूचा मोबाईल लोकेशन घेतल्यावर तो मध्यप्रदेशातील सिवनी येथे असल्याची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले. तिथे त्याच्या बहिणीच्या घरून अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी नागपूर गाठले. नागपुरातील जरीपटका परिसरातील दिनेश हा पोद्दार शाळेच्या मुलांच्या वाहनावर चालक असल्याची माहिती मिळाल्याने शाळेजवळ सापळा रचून दिनेशला ताब्यात घेतले. त्यानंतर दिनेशच्या माहितीवरून सरजूला त्याच्या घरून ताब्यात घेतले. तिघांकडून १ लाख १४० रूपये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली. १२ तासात या तिघांनाही कारधा पोलिसांनी अटक केली. तिघानांही मंगळवारला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता, तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.