संमेलनातून आविष्कार घडतो - शारदा शांडिल्य
By admin | Published: December 31, 2014 11:19 PM2014-12-31T23:19:56+5:302014-12-31T23:19:56+5:30
विद्यार्थ्यांना शाळेतून नेतृत्व गुणाचे व्यासपीठ मिळत असते. या व्यासपीठावरून विविधांगी कला प्रदर्शन करता येतात. विद्यार्थ्यांनी संधी येण्याची प्रतीक्षा करू नये, संधी निर्माण केली पाहिजे.
मोहाडी: विद्यार्थ्यांना शाळेतून नेतृत्व गुणाचे व्यासपीठ मिळत असते. या व्यासपीठावरून विविधांगी कला प्रदर्शन करता येतात. विद्यार्थ्यांनी संधी येण्याची प्रतीक्षा करू नये, संधी निर्माण केली पाहिजे. अशा शालेय संमेलनातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा आविष्कार होत असतो, असे प्रतिपादन रामकुवर शिक्षण संस्था भंडारा अध्यक्ष शारदा शांडिल्य यांनी केले.
महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून वरील मत शारदा शांडिल्य यांनी व्यक्त केले. संमेलनाचे उद्घाटन सरपंच राजेश लेंडे यांनी केले. व्यासपीठावर अतिथी म्हणून रामकुंवर शिक्षण संस्था सचिव अजय शांडिल्य, बोथलीचे सरपंच कैलाश तितीरमारे, मोहगाव केंद्रप्रमुख तेजस्विनी देशमुख, मुख्याध्यापक राजकुमार बांते, रामकृष्ण सेलोकर, मोतीराम बाळबुधे, प्रदीप वैद्य, एकराम डोकरीमारे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकातून मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी शाळेत राबविणारे उपक्रम व मागील तीस वर्षाची शाळेची वाटचाल याविषयी माहिती सांगितली. यावेळी केंद्रप्रमुख तेजस्विनी देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी मोठे होण्याचे स्वप्न बघून ते वास्तवात उतरावे. स्पर्धेच्या काळात प्रचंड मेहनत घ्यावी असे सांगितले. यावेळी सरपंच कैलाश तितीरमारे, अजय शांडिल्य यांनी आपले मनोगतात व्यक्त केले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून एकही रजा न घेणारे व विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक घेतलेले शिक्षक हंसराज भडके, प्रयोगशळा परिचर मोहन वाघमारे, सहायक शिक्षक हेमराज राऊत यांचा अतिथींच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन सहा. शिक्षक हेमराज राऊत तर आभार प्रदर्शन हंसराज भडके यांनी ेकले. शोभा कोचे, वर्षा ढोमणे, धनराज वैद्य, श्रीहरी पडोळे, लीलाधर लेंडे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)