साकोली येथील नवीन तहसील इमारतीची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:38 AM2021-09-18T04:38:23+5:302021-09-18T04:38:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : दोन वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेल्या साकोली तहसील कार्यालयाच्या इमारतीला गळती लागल्याने बांधकामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : दोन वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेल्या साकोली तहसील कार्यालयाच्या इमारतीला गळती लागल्याने बांधकामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या इमारतीच्या कामात अंदाजपत्रकानुसार साहित्य वापरण्यात आले किंवा नाही, या सर्व बाबींची चौकशी होणार असून, नियमाप्रमाणे काम झाले नसल्यास दोषी अधिकारी व अभियंते यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी विश्वसनीय माहिती आहे. याबाबतचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.
दोन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून साकोलीच्या गडकुंभलह रस्त्यावर तहसील कार्यालयाची नवीन प्रशस्त इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे बांधकाम साकोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात आले होते. त्यावेळी उपविभागीय अभियंता म्हणून ऋतुजा बंजारी या कार्यरत होत्या. मात्र, वर्षभरापूर्वी त्यांचे नागपूर येथे स्थानांतरण करण्यात आले आहे. या इमारतीचे बांधकाम अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. पार्किंगच्या जागेसह इतर सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र कंत्राटदार, अभियंता यांनी हे बांधकाम शासकीय असल्यामुळे दुर्लक्षित धोरणाचा वापर करून केलेले आहे. या बांधकामात अंदाजपत्रकानुसार, साहित्याच्या वापर करण्यात आला नसावा. त्यामुळेच दोन वर्षांत इमारतीला गळती सुरू झाली आहे. ही गळती अशीच सुरू राहिल्यास भविष्यात या इमारतीला नक्कीच धोका उद्भवू शकतो. या इमारतीला लागलेल्या गळतीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच बांधकाम विभाग खडबडून जागा झाला आहे. त्यांनी शुक्रवारी एका शाखा अभियंत्यांना इमारतीत गळती कशामुळे होत आहे, याची प्राथमिक चौकशी करण्यासाठी पाठविले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सोमवारी उपविभागीय अभियंता त्याठिकाणी जाणार आहेत. इमारतीत गळती कशामुळे होत आहे, इमारतीचे बांधकाम करताना साहित्याचा वापर योग्य प्रमाणात करण्यात आला आहे किंवा नाही, बांधकाम करताना शाखा अभियंता यांनी अंदाजपत्रकानुसार काम होत आहे किंवा नाही हे तपासले की नाही या सर्व बाबींचा एक अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
बॉक्स
दोषींवर कारवाई होणार
चौकशीनंतर दोषी उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, राजकीय दबाव व पैशाच्या जोरावर प्रकरण दाबण्यात येऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र, तहसील कार्यालय इमारतीच्या बांधकाम गुणवत्तेविषयी शंका उपस्थित होत आहे. प्रभारी उपविभागीय अभियंता मटाले यांनी शाखा अभियंत्याना चौकशीचे आदेश दिले आहेत. हा चौकशी अहवाल आल्यानंतर काय सत्य समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.