वाघांच्या शिकारीचा तपास संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:54 AM2019-07-14T00:54:21+5:302019-07-14T00:54:47+5:30
तीन वाघ आणि दोन बिबट्यांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस येऊन दोन आठवडे उलटले तरी मोरक्या मात्र वनविभागाचा हाती लागला नाही. मध्यप्रदेशात आठवडाभर तळ ठोकून असलेले पथकही रिकाम्या हाताने परतले. स्थानिक शिकाऱ्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास संथगतीने सुरु असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तीन वाघ आणि दोन बिबट्यांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस येऊन दोन आठवडे उलटले तरी मोरक्या मात्र वनविभागाचा हाती लागला नाही. मध्यप्रदेशात आठवडाभर तळ ठोकून असलेले पथकही रिकाम्या हाताने परतले. स्थानिक शिकाऱ्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास संथगतीने सुरु असल्याचे दिसून येत आहे.
भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात दोन आठवड्यापुर्वी रानडुकराच्या शिकारीतून वाघाच्या शिकारीचे प्रकरण पुढे आले. स्थानिक शिकाऱ्यांना वनविभागाने अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी तीन वाघ, दोन बिबटांची शिकार केल्याची कबुली दिली. यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली. वनविभागाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. स्थानिक शिकाºयाकडून मिळालेल्या माहितीवरुन वनविभागाचे पथक मध्यप्रदेशात गेले. त्याठिकाणी या पथकाने शिकार प्रकरणाच्या मोरक्याचा शोध घेतला. परंतु मोरक्या हाती लागला नाही. अखेर वनविभागाचे पथक रिकाम्या हातानेच परत आले. दरम्यान या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल पथक जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाचा तपासातही अपेक्षित यश हाती आले नाही. तीन वाघांची शिकार झाल्याचे पुढे आल्यानंतरही हवा तसा तपास होताना दिसत नाही. दरम्यान वनविभाग स्थानिक शिकाºयांचीच कसून चौकशी करीत असून ठोस काहीही हाती लागले नाही. या शिकाºयांनी शिकार केलेल्या वाघांचे अवयव नेमके कुठे ठेवले, कुणाला विकले यात कोणत्या टोळीचा समावेश आहे याची माहिती अद्यापही पुढे आली नाही. भंडारा जिल्ह्यातील पवनी कºहांडला अभयारण्यात तीन महिन्यापूर्वी दोन वाघांचा मृत्यू झाला होता. ते प्रकरणही सध्या थंडबस्त्यात आहे. आता पुन्हा तीन वाघाचा शिकारीचे प्रकरण पुढे आले. मात्र हा तपासही अतिशय संथगतीने होत आहे.
भंडारा जिल्हा वनसंपदेने नटलेला आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत. परंतु पुरेशा सुरक्षेअभावी वन्यजीवांची मोठ्या प्रमाणात शिकार होते. जंगलालगत असलेल्या गाव कुसात वन्यप्राणी शिरतात. त्यावेळी त्यांना पिटाळून लावताना वन्यजीवांचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. वन विभागाने या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. जिल्ह्यात शिकारीच्या संख्येत वाढ होत असताना वनविभाग मात्र शासकीय सोपस्कार पार पाडण्यात गुंतलेली असते.
वन्यजीवांची सुरक्षा वाऱ्यावर
भंडारा जिल्ह्यातील अभयारण्यांमध्ये हिंस्त्र आणि तृणभक्षी प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. या प्राण्यांच्या शिकारीचे प्रकार नेहमी पुढे येतात. आता तर तीन वाघ आणि दोन बिबट्याच्या शिकारीचे प्रकरण पुढे आले. यावरुन जंगलातील वन्यजीवांची सुरक्षा वाºयावर असल्याचे दिसून येते. वनविभागाचे पथक नेमकी गस्त कशी घालतात हा संशोधनाचा विषय आहे. वाघाच्या शिकारीचे प्रकरणी अपघाताने पुढे आले. रानडुकरांची शिकार माहित झाली नसती तर वाघाचा शिकारीचे प्रकरणही पुढे आले नसते.