प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना अनियमित लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:34 AM2021-08-29T04:34:03+5:302021-08-29T04:34:03+5:30
लाखांदूर तालुक्यातील चार महसूल मंडळातील तब्बल ८९ गावांतील ३० हजार ७३३ खातेदार शेतकरी असल्याची माहिती आहे. त्यात एकूण ३० ...
लाखांदूर तालुक्यातील चार महसूल मंडळातील तब्बल ८९ गावांतील ३० हजार ७३३ खातेदार शेतकरी असल्याची माहिती आहे. त्यात एकूण ३० हजार ७०५ शेतकऱ्यांद्वारा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभाची मागणी करण्यात आली. मात्र मागणी करण्यात आलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अनियमितपणे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांत केला जात आहे.
शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी तालुक्यातील ३० हजार ७३३ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून त्यापैकी ३० हजार ७०५ शेतकऱ्यांना पात्र ठरविण्यात आले. मात्र पात्र शेतकऱ्यांपैकी केवळ १० हजार ५३३ शेतकऱ्यांना या योजनेचा नियमित लाभ उपलब्ध केला जात आहे. तर उर्वरित १९ हजार ३८१ शेतकऱ्यांना या योजनेचा अनियमित लाभ मिळत आहे.
या प्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन योजनेतील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा नियमित लाभ उपलब्ध करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
बॉक्स :
८९१ शेतकरी लाभापासून वंचित
गत तीन वर्षांपूर्वी शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी तालुक्यातील ३० हजार ७३३ शेतकऱ्यांपैकी ३० हजार ७०५ शेतकऱ्यांना या योजनेकरिता पात्र ठरविण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील २९ हजार ८१४ शेतकऱ्यांना या योजनेचा नियमित तथा अनियमितपणे लाभ उपलब्ध केला जात आहे. मात्र उर्वरित ८९१ शेतकऱ्यांना गत तीन वर्षांपासून या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.