तुमसर येथे कचरा घंटागाडीच्या फेऱ्या अनियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:22 AM2021-07-22T04:22:24+5:302021-07-22T04:22:24+5:30

तुमसर: तुमसर शहरात मागील दहा ते बारा दिवसांपासून कचरा घंटागाडीच्या फेऱ्या अनियमित होत आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरी कचरा साठवून ...

Irregular rounds of garbage bells at Tumsar | तुमसर येथे कचरा घंटागाडीच्या फेऱ्या अनियमित

तुमसर येथे कचरा घंटागाडीच्या फेऱ्या अनियमित

Next

तुमसर: तुमसर शहरात मागील दहा ते बारा दिवसांपासून कचरा घंटागाडीच्या फेऱ्या अनियमित होत आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरी कचरा साठवून ठेवला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा कुठे नेऊन टाकावा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नगरपालिकेला संपर्क साधून माहिती दिल्यानंतर त्या प्रभागात घंटागाडी पाठवण्यात येते. नियमित घंटागाडी नगरपालिका प्रशासनाने पाठवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तुमसर शहरात कचरा घंटागाडी नियमित येत नाही. त्यामुळे नागरिकांना कचरा कुठे टाकावा असा प्रश्न पडला आहे.

शासनाने शहराकरिता कचरा घंटागाड्या दिल्या आहेत. मागील दहा ते बारा दिवसांपासून नियमित घंटागाडी येत नाही. नगरपालिका प्रशासनाला माहिती दिल्यानंतर त्या प्रभागात घंटागाडी पाठविण्यात येते. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांना प्रभागातील नागरिकांनी संपर्क साधल्यावर त्या प्रभागात घंटागाडी पाठविण्याची हमी दिली. त्याप्रमाणे प्रभागांमध्ये घंटागाडी पाठवण्यात येते असे सांगितले. मागील १९ महिन्यापासून कचरा उचल करणाऱ्या कंत्राटदाराला येथील मुख्य अधिकाऱ्यांनी थकीत बिल दिले नाही. त्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले होते. त्यानंतर कचरा कंत्राटदाराने सफाई कर्मचाऱ्यांना पगार दिला आता उर्वरित दोन ते तीन महिन्याचा पगार शिल्लक आहे, असे सांगितले जाते.

नगरपरिषदेने कचरा कंत्राटदाराला त्यांचे थकीत बिल देण्यात यावे असा ठराव घेतला. याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नगरपालिकेचे कर्मचारी कचरा उचलण्याचे काम करीत आहेत. कोरोना संक्रमण काळात नगरपरिषदेने स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. शहर स्वच्छ ठेवण्याचे काम विशेषता नगरपालिकेचे आहे. मुख्याधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कंत्राटदाराचे थकीत बिल नगरपालिका प्रशासनाने तत्काळ देण्याची गरज आहे.

कोट बॉक्स

मागील १९ महिन्यापासून कचरा कंत्राटदाराला त्यांचे बिल देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. परंतु शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली होती. प्रभागातील नागरिकांनी माहिती दिल्यावर त्या ठिकाणी घंटागाडी पाठवण्यात येते. कंत्राटदाराचे थकीत बिल द्यावे याकरिता ठराव घेण्यात आला. सदर माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु मुख्य अधिकारी व कनिष्ठ अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे कचरा उचलण्याची समस्या निर्माण झाली आहे.

- प्रदीप पडोळे नगराध्यक्ष, तुमसर.

कोट बॉक्स

तुमसर शहरात मागील बारा-तेरा दिवसांपासून नियमित घंटागाडी येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये कचरा जमा आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिक नगर परिषदेला कर देतात त्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपालिका प्रशासनाची आहे. नागरिकांना वेठीस धरणे कदापि खपवून घेतले जाणार नाही.

प्रा.कमलाकर निखाडे, जिल्हा महासचिव काँग्रेस.

Web Title: Irregular rounds of garbage bells at Tumsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.