पोलिस पाटील भरतीतील अनियमितता भोवली, तीन अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 10:32 AM2023-06-29T10:32:27+5:302023-06-29T10:34:53+5:30

विभागीय चौकशीचेही आदेश: एसडीओंसह दोन तहसीलदारांवर कारवाई

Irregularities in police Patil recruitment, three officers of bhandara district are suspended | पोलिस पाटील भरतीतील अनियमितता भोवली, तीन अधिकारी निलंबित

पोलिस पाटील भरतीतील अनियमितता भोवली, तीन अधिकारी निलंबित

googlenewsNext

भंडारा : भंडारा उपविभागात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पोलिस पाटील पदभरतीत अनियमितता झाल्याच्या गंभीर तक्रारी करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हाधिकारी स्तरावर तपासाअंती प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार भंडाऱ्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे तथा पवनीच्या तत्कालीन तहसीलदार नीलिमा रंगारी यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. हा आदेश महसूल व वन विभाग खात्याने मंगळवारी निर्गमित केला.

माहितीनुसार, भंडाऱ्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे तसेच पवनीच्या तत्कालीन तहसीलदार नीलिमा रंगारी या पदावर असताना त्यांनी पोलिस पाटील भरतीत अनियमितता केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यात पोलिस पाटील भरतीची प्रक्रिया सुरू असताना पोलिस पाटलांच्या पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. त्या उमेदवारांनी दिलेल्या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध न करताच प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व उमेदवारांना बोलावण्यात आले.

नियमानुसार परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करूनच एका जागेसाठी जे निकष लावले गेले असतील, त्यांनाच बोलवायला पाहिजे होते. परंतु तसे न करता सर्वच परीक्षार्थींना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. यावर तक्रारकर्ता शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. या शिष्टमंडळात अंकुश वंजारी, परमानंद मेश्राम, प्रमोद केसलकर, बालू ठवकर, डॉ. देवानंद नंदागवळी यांचा समावेश होता. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी प्राथमिक चौकशी केली असता, प्रथमदर्शनी तथ्य दिसून आले. तसेच २० जून २०२३ रोजी विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अन्वये अहवालही प्राप्त झाला. त्यामुळे मंगळवारी तत्कालीन एसडीएमसह दोन तहसीलदारांना शासन सेवेतून निलंबित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. तसेच यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीची कारवाई करण्याचेही आदेशात नमूद आहे.

दोन अधिकाऱ्यांचे झाले स्थानांतरण...

भंडाऱ्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी हे सध्या पालघर येथे रोहयो उपजिल्हाधिकारी म्हणून पदावर कार्यरत होते. तर पवनीच्या तत्कालीन तहसीलदार नीलिमा रंगारी यांची चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाडी येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली होती. तर अरविंद हिंगे हे भंडारा येथे तहसीलदारपदी कायम होते. पोलिस पाटील भरतीत या तिन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने प्रशासनिक गोटात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Irregularities in police Patil recruitment, three officers of bhandara district are suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.