सामाजिक वनीकरण विभागाच्या कामात अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:13 PM2017-10-30T22:13:46+5:302017-10-30T22:13:59+5:30
तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागांतर्गत वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन रोपवाटिका तथा येथे उद्यान तयार कण्याची कामे करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागांतर्गत वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन रोपवाटिका तथा येथे उद्यान तयार कण्याची कामे करण्यात आली. कामे करताना दर्शनी भागावर फलक लावून त्यावर अंदाजपत्रकीय रक्कम लिहिण्याचा नियम आहे. परंतु सुरुवातीला तसे केले नाही. ध्यानाकर्षणानंतर संबंधित विभागाने आता फलकावर अंदाजपत्रकीय किंमत लिहिली. यावरुन सामाजिक वनीकरण भ्रष्टाचाराचे कुरण तर ठरत नाही असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
कॅम्पा योजनेअंतर्गत महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेअंतर्गत डोंगरला ते तुमसर मार्गावर वृक्ष लागवडीचे कार्यक्रम राबविण्यात आले. वृक्ष लागवडीचा मार्ग एकूण दोन किमी आहे. लावण्यात आलेल्या रोपांची संख्या सोडून पोलादी फलकावर प्रशासकीय मंजुरीचा दिनांकाची नोंद आहे. १० दिवसापूर्वी फलकावर किंमतीची नोंद नव्हती. आता मात्र अंदाजीत रक्कम १३ लक्ष ५७ हजार ५३९ रुपयांची नोंद करण्यात आली.
मौजा डोंगरला येथे स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यानात वृक्ष देखरेखीची व संगोपनाची कामे सुरु आहेत. दोन आठवड्यापूर्वी येथे काटेरी झुडूप व उंच वाढलेले गवत येथे मोठ्या प्रमाणात तयार झाले होते. सध्या उद्यानात स्वच्छतेची कामे व सौंदर्यीकरणाची कामे सुरु करण्यात आली आहेत. डोंगरला ते सितेपार रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या वृक्षांच्या संरक्षणाकरिता काटेरी झाडांचे कुंपण तयार केली जात आहेत. पूर्वी येथे जवळील झाडांची फांद्या तोडून त्यांचे संरक्षण कवच तयार केले होते. लोकमतने ध्यानाकर्षण करुन त्याला वाच्यता फोडली. सामाजिक वनीकरण विभागाने कामांचे ठिकठिकाणी पोलादी फलक लावले आहेत तिथे सध्या अंदाजपत्रकीय रक्कमेचे उल्लेख व काम पूर्ण केल्याचा दिनांक नमूद केले जात आहे. पूर्वी ही कामे का करण्यात आली नाही, असा प्रश्न आहे
चरण वाघमारे यांनी मागितला अहवाल
तुमसरचे आ. चरण वाघमारे यांनी मागील तीन वर्षाचा संपूर्ण अहवाल उपसंचालक, सामाजिक वनिकरण यांना मागितला आहे. तीन वर्षातील वृक्ष लागवड, संवर्धन, साहित्य खरेदी, मजूरांची संख्या त्यावरील खर्च या सर्व बाबींची अहवाल मागीतला आहे. यामुळे संबंधित विभाग खळबळून जागा झाला आहे. कामात घोळ तथा अनियमितता आढळून आली तर नियमानुसार संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे आ. चरण वाघमारे यांनी लोकमतला सांगितले.
सामाजिक वनिकरण हा महत्त्वपूर्ण विभाग असून वृक्ष लागवड व संवर्धन, संगोपन करण्याची महत्वपूर्ण कामे हा विभाग करतो, पंरतु या विभागाकडे स्वत:ची जागा नाही. वनविभाग व महसूल विभागाकडे जागा मागावी लागते. त्यामुळे अनेक अडचणी या विभागासमोर आहेत. एकच लक्ष्य पंधरा कोटी वृक्ष असे जरी ब्रीद या विभागाचे असले तरी लक्ष्य साध्य करण्याकरिता शासनाच्या वरिष्ठ अधिकाºयानी लक्ष देण्याची गरज आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यातील सामाजिक वनिकरण खात्यामार्फत राबविलेल्या कामाची तपासणी होणार असल्याची माहिती आहे.