‘मड्डा’ झालेल्या भात पिकात सिंचनाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 09:46 PM2018-10-16T21:46:28+5:302018-10-16T21:47:00+5:30

निसर्गाने साथ सोडली. मानवनिर्मित संकटही निर्माण झाले. पेंच प्रकल्पाचे टेलवर पाणी उशिरा आले. तत्पूर्वीच पीक करपले. अशा विपरित परिस्थितीत मोठ्या धाडसाने शेतकरी ‘मड्डा’ झालेल्या भात शेतात सिंचन करीत आहे.

Irrigation clash between 'Madha' rice crop | ‘मड्डा’ झालेल्या भात पिकात सिंचनाची धडपड

‘मड्डा’ झालेल्या भात पिकात सिंचनाची धडपड

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची आशा: राजकारण भोवले, दुष्काळाचे सावट

राजू बांते।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : निसर्गाने साथ सोडली. मानवनिर्मित संकटही निर्माण झाले. पेंच प्रकल्पाचे टेलवर पाणी उशिरा आले. तत्पूर्वीच पीक करपले. अशा विपरित परिस्थितीत मोठ्या धाडसाने शेतकरी ‘मड्डा’ झालेल्या भात शेतात सिंचन करीत आहे.
मोहाडी परिसरात शेवटच्या टोकावरील भात शेतीत सिंचनासाठी पंचविस दिवस उशिरा पाणी आले. आधीच पऱ्हे करपले होते. हेच पाणी पंचवीस दिवसापूर्वी टेलवर शेतीत पोहचला असता तर अर्धेतरी पीक शेतकऱ्यांच्या हातात आले असते. रोहणा, दहेगाव, चिचखेडा, मोहगावदेवी, कान्हळगाव, मोरगाव, महालगाव, सिरसोली या परिसरातील अनेक भात पिकांचे तणस झाले असून शेतकरी तणस कापू लागले आहेत. पण काही भागात भात पीक करपले असतानाही शेतकरी मड्डा झालेल्या पिकांना सिंचन करीत आहेत. मड्डा म्हणजे परिपक्व न होता वाळलेले धान पीक होय. अनेक शेतात मड्डा झाला असताना शेतकरी मोठ्या आशेने आजही सिंचन करीत आहेत.
मागील वर्षीही मोहाडी तालुक्यातील गावांना दुष्काळाचा सर्वात जास्त फटका बसला होता. याहीवर्षी टेलवरील तसेच कान्हळगाव (सिर) येथील मायनर क्र.चारमधील अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक भाजून गेले आहे. अशा भाजलेल्या पिकात उभे राहून काहीतरी पीक घरी नेता येईल ही आशा ठेवून शेतकरी सिंचन करीत आहे. पेंचचे पाणी आले असतानाही शेतात डिझेल पंपचे आवाज सुरुच आहेत. डिझेलपंप, ट्रॅक्टरच्या सहाय्यानेही शेतीला सिंचन करणे सुरुच आहे.
पेंच प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांसाठी नाही. विणवणी केलीच तर उपकारापोटी शेतकºयांना खरीप पिकासाठी पाणी दिल्या जाते. त्यासाठी उपोषण, आंदोलन, रास्ता रोको, तोडफोड आदी शस्त्राचा उपयोग केल्यावर पाणी मिळते. अन्नदात्यांच्या बळावर स्वत:चा सन्मान करून घेणारे राजकारणी मंडळी किती संवेदनशील आहेत याबाबत निश्चितच शंका आहे. सिंचन करण्यासाठी श्रेयाची अप्रत्यक्ष - प्रत्यक्ष लढाई केली जाते. या शीतयुद्धात भरडला जातो शेतकरी. असाच किस्सा, यावर्षी पेंचच्या पाण्याच्या राजकारणात बघायला मिळाला. पेंचचे पाणी सुटण्यापूर्वीच कधी पाणी येईल याचे भविष्य एका नेत्याने केले होते. ती भविष्यवाणी तोंडघाशी पडली. जाहिररित्या प्रचार करणारा तो नेता आपले दोष झाकण्यासाठी पेंचच्या अधिकाऱ्यांना दोष देत सुटला होता. सिंचनाचा गंभीर प्रश्न असताना सत्ताधारी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे उपोषण तोडण्याचा निष्फळ प्रयत्न केला. या संघर्षाचा परिणाम शेतकऱ्यांना भोवला आहे.
दिवाळी सण अगदी तोंडावर आहे. या सणासुदीच्या दिवसात शेतकºयांच्या चेहºयावर निराशा दिसून येत आहे. पावसाने दगा दिला. पेंचचे पाणी उशिरा आले. करपा, तुडतुड्याने ही हल्ला केला. या निसर्ग व पेंच यंत्रणेच्या प्रकोपाने शेतकºयांना दुष्काळाच्या दुष्टचक्रात घातले गेले. पेंचचा पेच, दुष्टचक्र कधी थांबणार व शेतकरी कधी समृद्ध होणार याची किती प्रतीक्षा करायची असा सवाल केला जात आहे. एकंदरीत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आम्हाला कर्जमाफी नको. शेतीला सिंचन हवा. शासनाने खोट्या सन्मानाचा ढोल बडवू नये. शेतकऱ्यांचा विचार केवळ मतासाठी केला जातो.
- वाल्मीक मुटकुरे,
शेतकरी, कान्हळगाव (सिर)

Web Title: Irrigation clash between 'Madha' rice crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.