जीर्ण इमारतीत पाटबंधारेचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:41+5:30
भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयावर कुणीही नजर टाकल्यास निर्लेखीत केलेली इमारत असावी असा भास होतो. मात्र आत डोकावून बघितल्यास या इमारतीत शासकीय कामकाज सुरु असल्याचे दिसते. अधिकारी आणि कर्मचारी या जीर्ण इमारतीत दररोज कामकाज करताना दिसून येतात. इंग्रजकालीन इमारतीची प्रचंड दूरावस्था झाली आहे.
देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संपूर्ण जिल्ह्याच्या सिंचनाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असलेल्या येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाचीच दूरावस्था झाली आहे. इंग्रजकालीन इमारत जीर्णावस्थेत असून त्यावर माकडांचा हैदोस आणि इमारतीत कधी साप निघेल याचा नेम नसतो. गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या या इमारतीत कार्यकारी अभियंत्यासह कर्मचारी या खात्याचा कारभार सांभाळतात.
भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयावर कुणीही नजर टाकल्यास निर्लेखीत केलेली इमारत असावी असा भास होतो. मात्र आत डोकावून बघितल्यास या इमारतीत शासकीय कामकाज सुरु असल्याचे दिसते. अधिकारी आणि कर्मचारी या जीर्ण इमारतीत दररोज कामकाज करताना दिसून येतात. इंग्रजकालीन इमारतीची प्रचंड दूरावस्था झाली आहे. इमारतीचे कवेलू फुटले असून बांधकामही अतिशय जीर्ण अवस्थेत आले आहे. पावसाळ्यात तर या इमारतीत पाणी गळत असल्याचे येथे कार्यरत काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. झाडाझुडूपांचा वेढा या कार्यालयाला पडला असून तेथे माकडांचा नेहमी उच्छाद सुरु असतो. माकडांच्या उड्यांमुळे कवेलू फुटतात. एवढेच नाही तर अडगळीत असलेल्या या कार्यालयात कधी साप निघेल याचा नेम नसतो. यामुळे जीव मुठीत घेऊन कर्मचारी काम करताना दिसून येतात.
या कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांचा कक्ष आहे. ते या कार्यालयात येतात तेव्हा आपले वाहन गेटच्या बाहेरच ठेवावे लागते. कार्यालयाचे स्थलांतरण करण्यासाठी बांधकाम विभागाशी संपर्क साधण्यात आला. जिल्हाधिकाºयांनाही पत्र देण्यात आले. जिल्हाधिकाºयांनी याची दखल घेत संबंधित विभागाला सूचनाही दिली. परंतु अद्यापपर्यंत या कार्यालयाचे भाग्य फळफळले नाही.
कार्यालयातील दस्तावेज अस्ताव्यस्त पडले असून कधी धुळ आणि वरुन फुटलेले कवेलू पडेल याचा नेम नाही. जवळपास २५ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. परंतु त्यांना येथे काम करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. सदर कार्यालयाचे स्थानांतरण जुन्या कोषागार कार्यालयात झाल्यास थोडा दिलासा मिळू शकतो.
कार्यालयाची स्थिती ‘आधे इधर, आधे उधर’
पाटबंधारे विभागाच्या इमारतीची अवस्था पाहता या कार्यालयातील काही कामकाज दुय्यम निबंधक कार्यालयालगत असलेल्या बचत भवनाच्या आस्थापना विभागात हलविण्यात आला आहे. त्यामुळे एका कार्यालयाचे दोन ठिकाणी कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागतो. ‘आधे इधर आणि आधे उधर’ अशी या कार्यालयाची अवस्था झाली असून येथे येणाºया अभ्यागतांनाही त्याचा फटका बसतो. या इमारतीच्या पुनरूज्जीवनासाठी शासकीय पातळीवर पुढाकाराची गरज आहे.