६,२८८ हेक्टर क्षेत्रात सिंचन वाढले
By Admin | Published: June 3, 2017 12:15 AM2017-06-03T00:15:50+5:302017-06-03T00:15:50+5:30
जिल्हा प्रशासनाने मागीलवर्षी प्रकल्प आणि विहिरींपासून खरीप, रबी व उन्हाळी हंगामात ७६ हजार ६०५ हेक्टर क्षेत्रात सिंचन करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते़...
सिंचनावर कोट्यवधींचा खर्च : देखभाल व दुरूस्तीकडे मात्र लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष
देवानंद नंदेश्वर। लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा प्रशासनाने मागीलवर्षी प्रकल्प आणि विहिरींपासून खरीप, रबी व उन्हाळी हंगामात ७६ हजार ६०५ हेक्टर क्षेत्रात सिंचन करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते़ प्रत्यक्षात ८२ हजार ८९३ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने ठरविलेल्या उद्दीष्टापेक्षा ६ हजार २८८ हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वाढले आहे. यावर्षी जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामासाठी ८० हजार ६५१ हेक्टर क्षेत्र प्रकल्प आणि विहिरींपासून सिंचन करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. सिंचन सुविधांसाठी कोट्यवधींचा खर्च होत असला तरी त्यांच्या देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
मागीलवर्षी ७४ टक्के पाऊस बरसला़ त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प आणि विहिरी तुडूंब भरले होते़ मात्र या पाण्याचे नियोजन योग्यरित्या करण्यात आले नाही़ याचा फटका यावर्षीच्या उन्हाळ्यात दिसून आला़ जिल्ह्यात पाणीटंचाई भेडसावत आहे़ शासन आणि प्रशासनाने योग्य नियोजन केले असते तर पाणी टंचाईचा प्रश्न उद््भवला नसता़ जिल्ह्यात १६ हजार ८१३ प्रकल्पांची संख्या आहे़ यात पाटबंधारे विभाग (राज्य) अंतर्गत मोठी बावनथडी आणि पेंच असे दोन मोठे प्रकल्प आहेत़ तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा आणि मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना व एक असे एकुण पाच मध्यम प्रकल्प आहेत़ लघुपाटबंधारे विभागाचे (राज्य) ५९ लघु प्रकल्प आहेत़ आणि एक स्थानिक स्तर प्रकल्प असे ६७ प्रकल्प आहेत. जिल्हा परिषद लघू पाटबंधारे अंतर्गत १४४ तलाव, १,१५४ माजी मालगुजारी तलाव, १७९ कोल्हापुरी बंधारे, ३६६ साठवण बंधारे, ६४६४ विहीरी अशा ८३०७ प्रकल्पांचा समावेश आहे.
८३७४ प्रकल्पांपासून सन २०१६-१७ मध्ये मागीलवर्षीच्या खरीप हंगामात ७६,५९० हेक्टर क्षेत्र सिंचनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते़ त्यापैकी ७७,५७७ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले़ यात पेंच व मोठे बावनथडी प्रकल्पातून २९,२४२ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले़ याप्रमाणे मध्यम प्रकल्पातून १४,६३७, लघू पाटबंधारे विभाग (राज्य) १३,९२३ हेक्टर, विहिर (राज्य) ५९१ हेक्टर, लघू पाटबंधारे विभाग (जि़प़) २,९१० हेक्टर, मामा तलावांपासून ८६७७ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले़ १७९ कोल्हापुरी बंधारेपासून २५२१ हेक्टर, ३६६ साठवण बंधाऱ्यापासून १५४६ हेक्टर, तर ६४६४ विहिरींपासून ३५३० हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले़ यावर्षी सन २०१७- १८ च्या खरिप हंगामात जिल्हा प्रशासनाने ८०,६५१ हेक्टर क्षेत्र प्रकल्प आणि विहीरींपासून सिंचन करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे़ हे उद्दीष्ट ठेवले असले तरी यावर्षी जिल्हा प्रशासन उद्दीष्ट साध्य करील काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़
रबी हंगामासाठी मागील वर्षी ८३७४ प्रकल्प सिंचनासाठी ठेवले होते. यात ६४६४ विहिरींची संख्या आहे. या प्रकल्पापासून केवळ १५ हेक्टर क्षेत्र सिंचन करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते़ त्यापैकी ३८४६ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले़ रब्बी हंगामात उद्दीष्टापेक्षा ३ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रात सिंचनामध्ये वाढ झाली आहे. सिंचनासाठी दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळत असतो. परंतु, नियोजनाअभावी सिंचनाचा प्रश्न मार्गी लागू शकला नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
शाश्वत सिंचनापासून शेतकरी वंचित
राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या गोसेखुर्द (इंदिरासागर) धरणाचे काम पुर्णत्वाला आले असले तरी उजवा व डावा कालवा दुरूस्तीची कामे, उपसा सिंचन योजनेची कामे अपूर्णावस्थेत आहेत. या धरणाचे पाणी शेतापर्यंत पोहचविण्यासाठी उजवा व डावा असे दोन्ही मुख्य कालवे बांधण्यात आले. या कालव्यापासून तयार करण्यात आलेले लघु कालवे व वितरिकांचे कामे अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी अडचणी येत आहेत. ३० किमी.चा उजवा कालवा तयार आहे. परंतु कालव्याचे पाणी शेतापर्यंत जाण्यासाठी बांधलेले लघू कालवे व वितरिका अपूर्णावस्थेत असून सदोष बांधकामाचा फटका शेतकऱ्यांना बसला. नेरला उपसा सिंचन योजनेचे काम आॅगस्ट २०१६ मध्ये सुरू झाले असून ऊर्वरित कामे तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मागीलवर्षी ३,५०० हेक्टर क्षेत्रात सिंचन झाले असले तरी शाश्वत सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही.