उन्हाळी धान पिकांचे पाणी वाटपातून ६० एकर शेतीला सिंचनातून वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:17+5:302021-01-08T05:55:17+5:30
चुल्हाड ( सिहोरा ) : डावा कालवा अंतर्गत यंदा उन्हाळी धान पिकांचे लागवडीसाठी चांदपूर जलाशयाचे पाणी सिंचनासाठी देण्यात ...
चुल्हाड ( सिहोरा ) : डावा कालवा अंतर्गत यंदा उन्हाळी धान पिकांचे लागवडीसाठी चांदपूर जलाशयाचे पाणी सिंचनासाठी देण्यात येत असले तरी देवरी देव गावांचे शिवारातील ६० एकर शेती वगळण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. पाटबंधारे विभागाने कालव्यात सिमेंटचे पोती घातले असल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे. यामुळे या शेतीचा समावेश करण्यासाठी भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष विनोद पटले यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
डावा कालवा अंतर्गत उन्हाळी धान पिकांना सिंचनासाठी यंदा चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. या कालव्यावरील गावांचे पाणी वाटप करण्याचे रोटेशन असल्याने अन्य कालव्यांवरील गावातील शेतकऱ्यांनी पाणी वाटपाची मागणी लावून धरली नाही. याशिवाय त्यांनी विरोध केला नाही. यामुळे पाटबंधारे विभागाचे अर्धे अधिक टेन्शन संपले. दरम्यान, डावा कालव्यावरील उन्हाळी धान पिकांना पाणी वाटपाचे नियोजन करताना १७ गावांचा शेतशिवाराचे समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीपासून या कालव्यावरील टेल असणारे शेत शिवार वगळण्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु अधिकृत सांगायला कुणी यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तयार नव्हते.
यामुळे शंका निर्माण झाल्या होत्या; परंतु संपूर्ण शेत शिवार ओलिताखाली येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना होती. यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकांचे लागवडीसाठी शेतीची मशागत शेतकऱ्यांनी केली. चांदपूर जलाशयाचे पाणी मिळणार असल्याने देवरी देव शिवारात असणाऱ्या ६० एकर शेत शिवारातील शेतकऱ्यांनी धान पिकांचे लागवडीसाठी नर्सरी घातले आहे. परंतु, ऐनवेळी पाटबंधारे विभागाने निर्णय फिरविला असल्याने शेतकऱ्यांना डोक्यावर हात ठेवण्याची पाळी आली आहे. देवरी देव गावांचे शेत शिवारातील कालव्यावर सिमेंटचे पोती घालून पाणी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे पुढे असणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही. पाटबंधारे विभागाच्या निर्णयामुळे शेतकरी संतापले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत आले आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीनंतर देवरी देव गावांचे शिवारात पाणी वाटप करण्यात येत आहे. यातही अनेक एकर शेती वंचित ठेवण्यात येत आहे.
याशिवाय अशीच बोंबाबोंब गोंडीटोला, सुकली नकुल, बपेरा गावांचे शेत शिवारात आहे. नहर, कालवे तयार असताना टेलवर असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे एकाच गावातील अर्धे उपाशी, तर अर्धे शेतकरी तुपाशी असे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे न्यायसगत निर्णय नसल्याने शेतकऱ्यांत आक्रोश वाढला आहेत. या गावांचे शेत शिवार समतल भागात असतांना टेलवर असल्याचा प्रश्नच येत नाही, असा सूर शेतकऱ्यांत आहे. वगळण्यात आलेल्या शेत शिवाराचा समावेश करण्याची मागणी देवरी देवच्या सरपंच वैशाली पटले, सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रपाल उके यांनी केली आहे. दरम्यान, या कालव्याचे शाखा अभियंता चौरे यांना अधिक माहितीकरिता संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
कोट -
देवरी देव गावांचे शेत शिवारातील ६० एकर शेती उन्हाळी धान पिकांचे पाणी वाटपातून वगळण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाने घेतलेला निर्णय अन्यायकारक असून, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करण्यात येईल.
- विनोद पटले, तालुका उपाध्यक्ष भाजयुमो तुमसर.
कोट
चांदपूर जलाशयात क्षमतेपेक्षा अधिक पाणी आहे. परंतु, अनेक गावांचे शेत शिवार टेलवर असल्याचे कारणावरून वगळण्यात आले आहे. डावा कालवा अंतर्गत संपूर्ण शेती ओलिताखाली आणली पाहिजे. पूर्व तयारी म्हणून शेतकऱ्यांनी धानाच्या नर्सरी तयार केल्या आहेत. पाटबंधारे विभागाने सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे.
-किशोर राहंगडाले, युवा नेते भाजप बपेरा.