सहा महिन्यांत घराच्या जमिनीच्या पट्ट्यांचा प्रश्न मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:53 AM2021-02-23T04:53:03+5:302021-02-23T04:53:03+5:30
संदीप कदम : कोदामढी येथील नाथजोगींना आश्वासन लाखांदूर : गावोगावी जाऊन हस्तरेषा पाहून व भीक मागून जगणाऱ्या भटक्या ...
संदीप कदम : कोदामढी येथील नाथजोगींना आश्वासन
लाखांदूर : गावोगावी जाऊन हस्तरेषा पाहून व भीक मागून जगणाऱ्या भटक्या नाथजोगी समाजाच्या विविध समस्या जाणून घेत येत्या सहा महिन्यांत घराच्या जमिनीच्या मालकी पट्ट्याचा प्रश्न मार्गी लावणार, असे आश्वासन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले. २० फेब्रुवारी रोजी लाखांदूर तालुक्यातील कोदामढी येथील नाथजोगी समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले असताना येथील नागरिकांशी चर्चेदरम्यान ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या गावातील आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, रोजगार यासह अन्य समस्यांसंबंधाने येथील गावकऱ्यांशी मनमोकळी चर्चा केली. या चर्चेत येथील सर्वाधिक महिलांनी सहभागी होत घरकुल योजनेसह संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, आधार कार्ड नसणे, रेशन कार्ड असूनही धान्य उपलब्ध न होणे, गावातील सौर पंप पाणी टाकीचे सार्वजनिक नळ योजनेला अनियमित पाणी उपलब्ध होणे, मजुरी काम नाही यासह विविध समस्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या. या सबंध समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या काही दिवसांत कोदामढी गावात शासन योजनेचे शिबिर आयोजित करून संजय गांधी, श्रावणबाळ, आधार कार्ड बनविणे, रेशन कार्डवर धान्य उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचे निर्देश साकोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह तालुका प्रशासनाला दिले.
एवढेच नव्हे, तर येथील नाथजोगी समाजातील अनेक कुटुंब शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून ताडपत्रीच्या झोपडीत राहत आहेत. मात्र, संबंधित जमिनीचा मालकी पट्टा नसल्याने या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याचे समजून घेत सदर अतिक्रमित जमिनीचा पट्टा व घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी येत्या सहा महिन्यांत प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी येथील शालेय विद्यार्थ्यांविषयी माहिती जाणून घेताना या समाजातील मुलांचे शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प दिसून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी "पोरं शाळेत गेली पाहिजेत" असे भावनिक आवाहन देखील केले. तथापि, आरोग्य विभागाच्या सर्वच लसीकरण कार्यात येथील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करीत सौरऊर्जेवर सुरू असलेल्या सार्वजनिक नळयोजनेला लवकरच वीज पुरवठा सुरू करण्यात येईल, असेही म्हटले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सबंध कोदामढी गाव फिरून येथील कुटुंबांच्या घरांची परिस्थिती जाणून घेतली. ही परिस्थिती जाणून घेताना नागरिकांनी सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन व येथील नागरिकांची वणवण थांबण्यासाठी प्रामुख्याने मजुरी काम उपलब्ध करण्यासह रोजगाराची मागणी केली.
या सबंध समस्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेत येत्या सहा महिन्यांत घरकूल योजनेच्या लाभासाठी प्राधान्याने अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावून अन्य समस्या देखील सिदविल्या जाणार असल्याचे आश्वस्त केले. यावेळी साकोलीचे उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, जिल्हा माहिती अधिकारी गीते, तहसीलदार अखिल मेश्राम यासह अन्य अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.