पतसंस्थेच्या व्यवस्थापकानेच केले २७ लाख हडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 06:56 PM2023-05-19T18:56:20+5:302023-05-19T18:56:52+5:30
Bhandara News बोगस प्रमाणपत्र तयार करून खातेदारांची आवर्ती ठेव विड्राल करून २७ लाखांवर अधिक रक्कम खुद्द व्यवस्थापकानेच हडपल्याचा प्रकार क्रांतिज्योती सावित्रीबाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेत पुढे आला आहे.
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : बोगस प्रमाणपत्र तयार करून खातेदारांची आवर्ती ठेव विड्राल करून २७ लाखांवर अधिक रक्कम खुद्द व्यवस्थापकानेच हडपल्याचा प्रकार क्रांतिज्योती सावित्रीबाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेत पुढे आला आहे. या प्रकरणात लेखा परिक्षकांच्या तक्रारीवरून पतसंस्थेच्या तत्कालिन व्यवस्थापकाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश कांबळे असे या व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रांतिज्योती सावित्रीबाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये प्रकाश कांबळे व्यवस्थापक पदावर कार्यरत होता. दरम्यान, १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०२१ या काळात त्याने हा घोटाळा केला. खातेदारांच्या आवर्ती ठेव सभासदांच्या नावाने बोगस प्रमाणपत्र तयार करून त्याने रक्कम विड्राल केली. दोन टप्प्यांमध्ये २६,७७,२७७ रु. आणि ५९,६४६ रु. या प्रमाणे त्याने एकूण २७,३६,९३२ रुपये काढून हेराफेरी केली.
ही बाब पतसंस्थेच्या लेखापरिक्षणात पुढे आल्यावर लेखा परीक्षक श्रेणी-२ (सहकारी संस्था, साकोली) विकास गजानन पोहरकर (५२) यांनी भंडारा पोलिसात तक्रार केली. यावरून आरोपीविरोधात कलम ४२०, ४०९, ४६८, ४७१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला.