गुळ व्यापाराला मागितली दोन लाखांची खंडणी; पैसे न दिल्यास बॉम्बने उडविण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 03:17 PM2022-02-23T15:17:43+5:302022-02-23T15:40:08+5:30
पत्रातून राधेशाम गुप्ता यांना दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. खंडणीचे पैसे तुमसर येथील बस स्थानकावर एका सीटवर सोडून निघून जावे, अन्यथा बंदूक किंवा बॉम्बने उडवून देण्यात येईल, अशी धमकीही देण्यात आली.
भंडारा : गुळ निर्मिती करून विकणाऱ्या एका व्यापाराला पत्राच्या माध्यमातून २ लाख रुपयांची खंडणी मागितली असून पैसे न दिल्यास बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली. सदर आशयाचे पत्र या व्यापाऱ्याच्या घराच्या दरवाज्यावर २१ फेब्रुवारी आढळले.
माहितीनुसार, राधेशाम बाबुलाल गुप्ता (७२) रा.नाकाडोंगरी ता. तुमसर असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
माहितीनुसार वयोवृद्ध असलेले राधेशाम गुप्ता हे नाकाडोंगरी येथील रहिवासी असून त्यांचा तुमसर तालुक्यात गुळ विक्रीचा व्यवसाय आहे. गुळ निर्मिती करने व लहान - मोठ्या व्यापाऱ्यांना गुळ विकणे असा हा त्यांचा व्यवसाय आहे. २१ फेब्रुवारीला ते आपल्या घरासमोरील लोखंडी गेट उघडण्यासाठी गेले असता त्यांना गेटवर एका लाल रंगाच्या कार्डवर लिहिलेले पत्र आढळले. पत्रातून त्यांना दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.
खंडणीचे पैसे तुमसर येथील बस स्थानकावर एका सीटवर सोडून निघून जावे, अन्यथा बंदूक किंवा बॉम्बने उडवून देण्यात येईल, अशी धमकीही देण्यात आली. गुप्ता यांनी याची माहिती तात्काळ गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यासंदर्भात पोलिसांनी प्रकरण नोंदवून घेत त्या दिशेने तपास सुरू केला आहे. गाव परिसर व तुमसर बसस्थानक परिसरात जाऊन गोपनीय माहिती व विचारपूस केली आहे. उल्लेखनीय म्हणजे गुप्ता यांनी तक्रारीत कुणावरही संशय व्यक्त केलेला नाही.
काय आहे पत्रात
गुप्ता यांच्याकडे आढळलेले पत्र हे हिंदी भाषेत आहे. या पत्रात, गुप्ता तुझी सुपारी देण्यात आली असून नागपूरचे चार शॉप शूटर लावण्यात आले आहे. तू दोन लाख रुपये मंगळवार दुपारी १२ बारा वाजेपर्यंत तुमसर बसस्थानकावरील एका खाली सीटवर सोडून निघून जा, अन्यथा बंदूक किंवा बॉम्बने उडवून देऊ, असे या पत्रात नमूद केले आहे.
गुप्ता यांनी खंडणीबाबत तक्रार दाखल केली आहे. त्या दिशेने आमचा तपास सुरू आहे. सध्या बयान नोंदविण्याचे काम सुरू असून गोपनीय चौकशीही केली जात आहे. गुप्ता यांनी अजूनपर्यंत कुणावरही संशय व्यक्त केलेला नाही.
-विलास करंगामी, पोलीस उपनिरीक्षक व तपासी अधिकारी, गोबरवाही.