शिक्षकांच्या ‘जय हिंद’ ग्रुपने गोळा केला शहीद निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 09:45 PM2019-03-10T21:45:38+5:302019-03-10T21:45:59+5:30
विद्यार्थ्यांवर संस्काराची जबाबदारी असलेल्या संवेदनशिल शिक्षकांनी पुलवामा हल्ल्यानंतर एकत्र येवून जय हिंद ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून तब्बल एक लाख २ हजारांचा निधी गोळा केला. हा निधी बुलढाणा जिल्ह्यातील संजय राजपूत आणि नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांना धनादेशाद्वारे देण्यात येणार आहे. या शिक्षकांच्या देश प्रेमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विद्यार्थ्यांवर संस्काराची जबाबदारी असलेल्या संवेदनशिल शिक्षकांनी पुलवामा हल्ल्यानंतर एकत्र येवून जय हिंद ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून तब्बल एक लाख २ हजारांचा निधी गोळा केला. हा निधी बुलढाणा जिल्ह्यातील संजय राजपूत आणि नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांना धनादेशाद्वारे देण्यात येणार आहे. या शिक्षकांच्या देश प्रेमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक जितेंद्र बुंदेले, योगेश पुडके, गणेश सार्वे यांनी पुलवामा हल्ल्यानंतर एकत्र येवून शहीदांचा कुटुंबियाना मदत करण्याचा निर्धार केला. त्यासाठी जयहिंद नावाचा ग्रुप तयार केला. सर्व शिक्षकांना स्वेच्छेने मदत देण्याचे आवाहन केले.
जिल्ह्यातील १०२ प्राथमिक शिक्षकांनी यात भरघोष मदत केली. या ग्रुपकडे एक लाख दोन हजार रुपयांचा निधी तयार झाला. शहीद कुटुंबीयांना खारीचा वाटा म्हणून शिक्षकांच्या या ग्रुपच्या वतीने मदत केली जाणार आहे. शहीद संजय राजपूत आणि शहिद नितीन राठोड यांच्या कुटुंबियाना हा निधी दिला जाणार आहे.
पवनीच्या शहिदाच्या पित्याने घडविला आदर्श
प्राथमिक शिक्षकांच्या जयहिंद ग्रुपने गोळा केलेल्या निधीतील ३० हजार रुपयांचा धनादेश एका समारंभात पवनी येथील शहीद प्रफुल्ल मोहरकर यांचे वडील अंबादास मोहरकर यांना देण्यात आला. अंबादास मोहरकर यांनी हा निधी सन्मानपूर्वक स्विकारल्यानंतर पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबियांना हे तीस हजार रुपये देण्याची इच्छा व्यक्त करीत सदर धनादेश जयहिंद गु्रपच्या सुपुर्द केला. देशासाठी लढलेल्या प्रफुल्लच्या वडीलांच्या या निर्णयाने सर्व शिक्षक नतमस्तक झाले. रविवारी झालेल्या या सोहळ्याला रमेश सिंगनजुडे, जीत बुंदेले, गणेश सार्वे, योगेश पुडके, मुकूंद ठवकर, हरिकिसन अंबादे, सुनील निनावे, देवानंद घरत, प्रमोद घमे, कुसूम लांबट, एन. एम. धकाते, व्ही. एम. जगनाडे, डी. एम. उरेकर, बी. जे. अंबादे, किशोर ईश्वरकर, राजू नानोटी, एन. ए. तुरकर, सिध्दार्थ चौधरी, रामधन धकाते, यु. आर. राठोड आदी उपस्थित होते.