आरोपीला १३ वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:33 AM2018-02-02T00:33:01+5:302018-02-02T00:33:15+5:30
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी भंडारा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी एका २२ वर्षीय तरूणाला १३ वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
ऑनलाईन लोकमत
भंडारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी भंडारा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी एका २२ वर्षीय तरूणाला १३ वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. अनिल गोपीचंद मारबदे रा. मुंडीपार ता.तिरोडा असे शिक्षा ठोठावलेल्या तरूणाचे नाव आहे. हा निकाल गुरूवारी देण्यात आला. ही घटना वरठी पोलीस ठाणेअंतर्गत खमाटा येथे घडली होती.
माहितीनुसार, खमाटा येथील अल्पवयीन मुलीची आई ही २६ एप्रिल २०१४ रोजी निलागोंदी येथे नातेवाईकाकडे लग्नसमारंभासाठी जात होती. यावेळी तिने आपल्या मुलीला लग्नाला येण्यासाठी सांगितले. मात्र सदर मुलीने जाण्यास नकार दिला. लग्नसमारंभातून परत आल्यावर सदर मुलगी घरी दिसून आली नाही. यावेळी मुलीचा गावात शोध घेण्यात आला.
शेजाºयांच्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी दुपारी १ वाजताच्या सुमारास मुलगी एकटीच जाताना दिसली. यावेळी तक्रारदाराला संशय आला की, एक महिन्यापुर्वी मुंडीपार येथील एका नातेवाईकाचा मुलगा अनिल गोपीचंद मारबदे हा गावात धान चुरण्याच्या कामानिमित्त आला होता. अनिल हा एक महिन्यापर्यंत फिर्यादीच्या घरी वास्तव्यास होता. याच संशयातून सदर तरूणाबाबत वरठी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे नमूद करण्यात आले.
पोलीस नाईक आकांत रायपुरकर यांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद कदम यांनी सुरू केला. घटनेच्या दिवशीपासून तब्बल १७ दिवसानंतर मुंडीपार येथून अनिल मारबदे याला पकडण्यात आले. तसेच पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगीक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी भादंविच्या ३७६ (२) (एन) सहकलम ३, ४, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर कारंडे यांनी केला. आरोपीविरूद्ध भक्कम पुरावा प्राप्त झाल्याने आरोपपत्र तयार करून भंडारा जिल्हा न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले.
सदर गुन्ह्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी केली. यात अनिल मारबदेविरूद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्या. पांडे यांनी त्याला १३ वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास प्रत्येकी तीन व सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे.
सरकारी पक्षातर्फे अॅड. विश्वास तवले यांनी बाजू मांडली तसेच गुन्ह्याच्या तपासाअंती पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सुकरू वलके, महादेव वंजारी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.