सुरक्षा कीटसाठी भंडारात ‘जत्रा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:49 PM2019-02-25T22:49:24+5:302019-02-25T22:49:45+5:30
अटल विश्वकर्मा बांधकाम कामगार योजनेची कीट मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत असून गत आठवडाभरापासून येथील साई मंदिर परिसरात बांधकाम कामगारांची जत्राच भरली आहे. कोणतीही सुविधा आणि माहितीचा अभाव असल्याने दररोज येथे गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. सोमवारी प्रचंड गर्दी झाल्याने या मार्गावरील वाहतुकही ठप्प झाली होती. तर किट मिळविण्यासाठी अनेक कामगार ‘मंगल’ कार्यालयाच्या फाटकावरुन चढून जात असल्याचे दृष्य होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अटल विश्वकर्मा बांधकाम कामगार योजनेची कीट मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत असून गत आठवडाभरापासून येथील साई मंदिर परिसरात बांधकाम कामगारांची जत्राच भरली आहे. कोणतीही सुविधा आणि माहितीचा अभाव असल्याने दररोज येथे गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. सोमवारी प्रचंड गर्दी झाल्याने या मार्गावरील वाहतुकही ठप्प झाली होती. तर किट मिळविण्यासाठी अनेक कामगार ‘मंगल’ कार्यालयाच्या फाटकावरुन चढून जात असल्याचे दृष्य होते.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक कीट व सुरक्षा किट नि:शुल्क वितरीत केली जात आहे. याचा अधिकृत उद्घाटन सोहळा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी भंडारातील दसरा मैदानावर पार पडला. मात्र त्यापुर्वीपासून येथील जिल्हा परिषद मार्गावरील साई मंगल कार्यालयात किट वितरण केली जात आहे.
जिल्हाभरातील नोंदणीकृत कामगार या ठिकाणी टोकन घेऊन कीट स्वीकारण्यासाठी येत आहे. परंतु येथे नियोजनाचा प्रचंड अभाव दिसत आहे. कामगार आयुक्त कार्यालयाच्या अगदी समोर हजारो कामगार सुरक्षा किटसाठी झुंबळ करुन आहेत. गत काही दिवसांपासून गावागावांतून कामगार याठिकाणी येतात. सकाळपासूनच येथे रांग लागलेली असते. १० वाजताच्या सुमारास वितरणाला प्रांरभ होतो. मात्र गोंधळामुळे अनेकदा वितरण खोळंबते. परिणामी कामगार संतप्त होतात. गोंधळ वाढत जातो. त्याचा परिणाम परिसरात राहणाऱ्यासोबत या मार्गावरील वाहतुकीलाही होत आहे.
जिल्ह्यात ३०हजार कामगारांची नोंद झाली आहे. या कामगारांना कीट वितरणासाठी जिल्ह्यात केवळ एकमेव केंद्र उघडण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वितरण केंद्र उघडले असते तर कामगारांना मनस्ताप सहन करावा लागला नसता. जिल्ह्याच्या टोकावरुन कामगार सकाळपासूनच भंडारा शहरात दाखल होतात. रोजमजुरी बुडवून आठ-आठ दिवस येथे सुरक्षा कीटसाठी गर्दी करुन असतात. दररोज भंडारात यावे लागत असल्याने आर्थिक फटका बसतो. महिलांची संख्या मोठी आहे. दिवसभर उन्हात ताटकळत असतात. मात्र याठिकाणी त्यांना कुणीही योग्य मार्गदर्शन करीत नाही. कामगार कल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर दररोज हा प्रकार घडत असतांना आयुक्त मात्र यावर तोडगा काढण्यास तयार नाही.
सोमवारी सकाळपासूनच सुरक्षा किटसाठी मोठी गर्दी झाली होती. कोणतीही व्यवस्था नसल्याने मंगल कार्यालयाच्या गेटवरुन अनेकजण चढून जाऊन किट मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. तर काही कामगार रांग लावून आपल्या क्रमांकाची प्रतीक्षा करीत होते. या कामगारांना तालुका ठिकाणी सुरक्षा किट वितरण करावे अशी मागणी येथे असलेल्या कामगारांनी केली.
साई मंदिर मार्गावर वाहतूक विस्कळीत
जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या तुमसर मार्गावर असलेल्या मंगल कार्यालयात सुरक्षा किट वितरण सुरु आहे. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. त्यातच एका बाजुने बांधकाम सुरु असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. मंगल कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात कामगारांची गर्दी आणि त्यांची वाहने उभी राहत असल्याने वाहतुक ठप्प होते. सोमवारी दुपारी १२ वाजता याठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. वाहतूक नियंत्रणासाठी साधा पोलीसही त्याठिकाणी उपस्थित नव्हता.
नगरपरिषदेतही उडाली झुंबड
बांधकाम कामगारांची नोंदणी नगर परिषदेत होत असल्याची माहिती कुणीतरी पसरविली आणि सोमवारी सकाळी ११ वाजतापासून नगर परिषदेत नोंदणीसाठी कामगारांची झुंबड उडाली. नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कामगार अधिकाºयाच्या कार्यालयापर्यंत पाय ठेवायला जागा नव्हती. कामगार नोंदणीची ही माहिती कुणी दिली याबाबत सर्वजण अनभिज्ञ दिसत होते. कामगारांना नोंदणीबाबत कामगार कार्यालयाकडून योग्य माहिती मिळत नसल्याचा आरोप होत आहे.