जयंत पाटील यांनी वाहनाचे केले स्वत: सारथ्य; भिवापूर ते भंडारा मध्यरात्री ६० किलोमीटर प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 03:51 PM2021-01-30T15:51:28+5:302021-01-30T20:32:35+5:30
युवा टीमशी संवाद
भंडारा : राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्यात दिवसभर सभा, बैठकांसोबत जनतेशी संवाद असा दिनक्रम. सोबतच्या युवा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधता यावा म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाहनाचे स्वत: सारथ्य केले. नागपूर जिल्ह्यातील भिवापूरपासून ६० किलोमीटरचा प्रवास करीत भंडारा गाठले. या दोन तासात त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर परिवार संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वात ही परिसंवाद यात्रा सध्या पूर्व विदर्भात आहे. या दौऱ्यात दिवसभर पक्षाचा आढावा, सभा आणि पदाधिकाऱ्यांसोबत जनतेच्या भेटीगाठी असा दिनक्रम असतो.
शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे सभा आटोपून जयंत पाटील भिवापुर येथे पोहचले. तेथून त्यांना भंडाराकडे निघायला मध्यरात्र उलटली होती. दुसऱ्या दिवशी भंडारात विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ते भिवापूर वरुन भंडाराकडे निघाले. मात्र यावेळी त्यांनी स्वत: स्टेअरिंगचा ताबा घेतला. तब्बल दोन तास वाहन चालवित पहाटे भंडारात पोहचले.
या दोन तासाच्या प्रवासात त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर युवा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. भंडारात पहाटे पोहचल्यानंतर सकाळी ६ वाजता ते नियोजित कार्यक्रमाच्या तयारीला लागले आणि ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलसंपदा विभागाची आढावा बैठकही घेतली. त्यांनी स्वत: वाहनाचे सारथ्य करुन युवा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याने युवा टीम चांगलीच प्रभावित झाली.