तामसवाडी घाटात जेसीबीने रेती खनन
By admin | Published: March 31, 2016 12:51 AM2016-03-31T00:51:18+5:302016-03-31T00:51:18+5:30
तालुका मुख्यालयापासून केवळ आठ कि.मी. अंतरावरील तामसवाडी रेती घाटावरून नियमबाह्यपणे व विनाक्रमांकांच्या जेसीबीने रेतीचे उत्खनन सुरु आहे.
मोहन भोयर तुमसर
तालुका मुख्यालयापासून केवळ आठ कि.मी. अंतरावरील तामसवाडी रेती घाटावरून नियमबाह्यपणे व विनाक्रमांकांच्या जेसीबीने रेतीचे उत्खनन सुरु आहे. १० दिवसापूर्वी या रेतीघाटाचा लिलाव झाला. परंतु शासकीय सोपस्कार पूर्ण झाले नाही. अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. या रेती तस्करीमुळे लाखोंचा महसूल बुडत आहे.
तुमसर तालुक्यातील तामसवाडी वैनगंगेचा नदी घाट उच्च दर्जाच्या रेती करिता प्रसिद्ध आहे. १० दिवसापूर्वी रेती घाटाचा लिलाव ७६ लाखात झाल्याची माहित आहे. याप्रकरणी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना विचारल्यावर तुम्हाला प्रत्येक बाब सांगण्यास मी बांधील नाही, असे उत्तर दिले. मागील २० ते २२ दिवसांपासून तामसवाडी रेती घाटातून अवैधरीत्या नियमबाह्य जेसीबीने रेतीचे उत्खनन सर्रास सुरु आहे. मध्यरात्री जेसीबी नदी पात्रात नेली जाते. पहाटे ५ ते ५.३० पर्यंत रेतीचा उपसा केला जातो. ट्रक व ट्रॅक्टर भरून ही रेती नेली जाते. दिवसभर रेती उत्खनन बंद ठेवण्यात येते. जेसीबी नदी काठावर आणून ठेवली जाते. मागील २० दिवसांपासून हा नित्यक्रम सुरु आहे. नदीकाठावर एक झोपडी तयार करण्यात आली आहे. या झोपडीत तीन ते चार युवक राहतात. झोपडी शेजारी पाण्याचा एक ट्रॅक्टरसुद्धा येथे ठेवण्यात आला आहे. झोपडीची जागा झुडपी जंगलात मोडते असे समजते.
काय आहे गोम ?
नागपूर महानगर पालिकेच्या चार नगरसेवकांनी मनसर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट पुल बांधकाम व सिमेंट रस्त्याचे कंत्राट घेतले आहे. याकरिता ३५ ते ४० हजार ब्रास रेतीची गरज पडत आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी, बेटाळा, वारपिंडकेपार व तामसवाडी या रेती घाटांवरूनच ही रेती नेण्यात येणार आहे. काही घाटावरून ती सध्या नेली जात आहे. तामसवाडी येथील रेतीघाट लिलाव झाल्यावर १० दिवसापेक्षा जास्त काळ झाला तरी येथे संबंधित कंत्राटदाराने रक्कम भरली नाही. नदीपात्रातून जेसीबीने दुसरा रेती उत्खनन करण्याची हिंमत करू शकेल काय? हा प्रश्न उपस्थित होते.