उघड्यावर जाणाऱ्यांना केले 'जायबंदी'
By admin | Published: February 5, 2017 12:18 AM2017-02-05T00:18:02+5:302017-02-05T00:18:02+5:30
मागील चार दिवसांपासून गुडमॉर्निंग पथकाने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना गुलाब फुल देवून त्यांना शौचालय वापराचा मुलमंत्र देण्यात येत आहे.
कर्कापुरात गुडमॉर्निंग पथकाची धरपकड : पाच वर्षीय बालकाचा पथकात समावेश
भंडारा : मागील चार दिवसांपासून गुडमॉर्निंग पथकाने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना गुलाब फुल देवून त्यांना शौचालय वापराचा मुलमंत्र देण्यात येत आहे. यात आज पहाटेच हे पथक कर्कापुरात दाखल होवून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना अक्षरश: धरून शौचालयात बसवून त्यांची प्रात:विधी उरकेपर्यंत या पथकांनी पिच्छा पुरविला. या अभिनव उपक्रमाने उघड्यावर जाणाऱ्यांची भंबेरी उडाली असून ग्रामस्थांनी मात्र स्वागत केले आहे.
स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या माध्यमातून जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. मागील आठवड्यात ओडीफ अंतर्गत लाखांदूर तालुका हागणदारीमुक्त झाल्याचे प्रशासनाने घोषित केले. आता उर्वरित तालुक्यांमध्ये हे उद्दीष्ट साध्य करण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने मागील चार दिवसांपासून स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या गुडमार्निंग पथकाने उघड्यावर जाणाऱ्यांची जणू नाकाबंदीच केली आहे. उमरवाडा, नवरगाव आणि बोरी या गावात गुडमार्निंग पथकाने भल्या पहाटेच दाखल होत उघड्यावर जाणाऱ्यांना गुलाब पुष्प देवून त्यांना शौचालय बांधण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. यात या गावांमध्ये सध्यातरी गुडमार्निंग पथकाची धास्ती असल्याचे चित्र दिसून येत आहे. गुडमार्निंग पथकाने त्यांचा मोर्चा आज तुमसर तालुक्यातीलच कर्कापूर या गावाकडे वळविला. पहाटे ४ वाजताच्या सुमारास नागरिक साखर झोपेत असताना हे पथक गावात दाखल झाले. तत्पूर्वी प्रशासकीय यंत्रणेला पथकाची माहिती देण्यात आली होती. त्या अनुषंगाने ग्रामविकास अधिकारी व काही ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडून उघड्यावर जाणाऱ्यांची माहिती घेतली होती. माहितीवरून पथकाने गावाच्या सिमेवर पथकातील कर्मचारी व ग्रामस्थांनी उघड्यावर जाणाऱ्यावर पाळत ठेवली. सकाळ होण्याच्या स्थितीत अंधाराचा फायदा घेत काही ग्रामस्थ हातात 'टमरेल' घेवून शेतशिवाराच्या दिशेने निघाले. या उघड्यावर जाणाऱ्या 'सावज'ला गुडमार्निंग पथकाने अलगत गराडा घातला. त्या व्यक्तीची विचारपूस करून त्याच्याकडील शौचालयाबाबत माहिती घेतली. शौचालय असतानाही हा व्यक्ती उघड्यावर जात असल्याने त्याला आरोग्याबाबत माहिती देवून शौचालयाचा वापर करण्याची सुचविले. मागील अनेक वर्षांपासून उघड्यावर जाण्याची सवय लागलेल्या या ग्रामस्थांना पथकाचे ऐकावे लागले. न जुमानणाऱ्या या व्यक्तीला पथकाने टमरेलसह उचलून धरत त्याच्या घरी शौचालयात बसविले. त्याची प्रात:विधी उरकेपर्यंत पथकाने शौचालयाच्या बाहेरच पाळत ठेवली. कर्कापूरात आज तीन ते चार प्रकार घडले. एक एक म्हणता या सर्वांना रस्त्यावरून उचलून घरी शौचालयात बसवून गुडमार्निंग पथकाने त्यांचे कर्तव्य बजावले.
गटविकास अधिकारी विजय झिंगरे यांच्या मार्गदर्शनात सहायक अधिकारी एस.एन. गायधने, ग्रामविकास अधिकारी पडोळे, जिल्हा कक्षाचे मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, सरपंच सुरजलाल सिंदपुरे, ग्रामपंचायत सदस्य प्रविणकुमार मिश्रा, पोलीस पाटील मुकूंद आगाशे, नारायण सिंदपुरे, माणिक आगाशे, योेगेश खोब्रागडे, नितीन राठोड, पल्लवी तिडके, हर्षाली ढोके, शशिकांत घोडीचोर, पोर्णिमा डूंभरे, वर्षा दहिकर, सिहोरा ठाण्याचे शिपाई ईश्वर चौधरी, विनोद आरीकर, टिंकू क्षीरसागर, महेश शेंडे आदींचा सहभाग होता. (शहर प्रतिनिधी)
उघड्यावर जाणाऱ्यांचे अभिवचन
शासकीय योजनेतून शौचालय बांधलेले असतानाही अनेक ग्रामस्थ उघड्यावर शौचास जातात. त्यातीलच कर्कापूर येथे आज काही ग्रामस्थ आढळल्याने त्यांना यापुढे अशी चुक केल्यास पोलीस कारवाई करण्याची तंबी पथकाने दिल्याने त्यांनी यानंतर उघड्यावर शौचास जाणार नाही, असे अभिवचन पथकाला दिले.
पाच वर्षीय बालकाचा पुढाकार
तुमसर पंचायत समितीच्या पाणी व स्वच्छता केंद्रात समूह समन्वयक असलेल्या घोडीचोर यांच्या पाच वर्षीय असाज या बालकाने गुडमार्निंग पथकासोबत आज कर्कापूर गाठले. के.जी. २ ला शिकणाऱ्या या बालकाने उघड्यावर जाणाऱ्या ग्रामस्थांना गुलाबाचे फुल देवून यानंतर असे न करण्याबाबत आश्वास्त करून घेतले. त्यांना शौचालयाचा वापर करण्याबाबत महत्व पटवून दिले. अजासच्या पुढाकाराने ग्रामस्थांनीही त्याला साद दिली.