जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 09:54 PM2018-12-24T21:54:58+5:302018-12-24T21:55:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देवून शेतकऱ्यांच्या सुविधांबाबत व समस्यांबाबत नेहमीच झटत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देवून शेतकऱ्यांच्या सुविधांबाबत व समस्यांबाबत नेहमीच झटत असून शासकीय योजनांचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळवून दिला. त्यामुळे शेतकऱ्यांची खरी बँक ही जिल्हा मध्यवर्ती बँक असून बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे व त्यांचे संचालक मंडळ यांनी बँकेची धुरा चांगल्याप्रकारे सांभाळली, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
मोहाडी तालुक्यातील करडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेच्या एटीएमच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा - गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार मधुकर कुकडे, विशेष अतिथी म्हणून माजी आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, माधव बांते, जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, माजी आमदार अनिल बावनकर, रामराव कारेमोरे, भाऊराव तुमसरे, राजू कारेमोरे, राजू माटे, आशिष पातरे, रिता हलमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा करडीच्या एटीएमचे उद्घाटन व जनजागृती मेळावा सोमवारला जिल्हा बँकेच्या करडी शाखेच्या समोरील पटांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी खासदार पटेल म्हणाले, देशात ६० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. जिल्ह्यात ८० ते ८५ टक्के लोक शेतीच्या भरोशावर आहेत. जणू काही जिल्ह्याचा श्वास म्हणजेच शेतकरी आहे. त्यांच्यासाठी जेवढे कराल तेवढे कमी आहे. म्हणून त्यांचा विचार पहिल्यांदा करायला हवा. आपण विकासाच्या बाबतीत चर्चा करतो, पण प्रामुख्याने त्या विकासाच्या बाबतीत शेतकºयांना विसरतो. असे न होता प्रामुख्याने शेतकºयांवर लक्ष केंद्रीत करायला हवे तेव्हाच जिल्ह्यासह देशाचा कारभार सुरळीत चालेल.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे म्हणाले, बँक शेतकऱ्यांकरीता व बँकेच्या ग्राहकांकरीता नेहमीच सकारात्मक भूमिकेत काम करीत असते. एकूणच शेतकऱ्यांची बँक म्हटल्यावर ग्रामीण भागातील शाखेमध्ये होणारी गर्दी व ग्राहकांना बँक सेवेचा लागणारा वेळ या सर्व बाबी लक्षात घेवून जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्रत्येक शाखेत एटीएम केंद्र सुरू करण्याचा मानस केला आहे. या सेवेचा शेतकरी बाधंवांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी खासदार मधुकर कुकडे, राजेंद्र जैन, नाना पंचबुध्दे, धनंजय दलाल, सदाशिव वलथरे, माधव बांते, रामलाल चौधरी, अनिल बावनकर, रामराव कारेमोरे, भाऊराव तुमसरे, राजू कारेमोरे, यांनी मार्गदर्शन केले.
संचालन मोहाडी तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वासु बांते, तर आभार प्रदर्शन महादेव पचघरे यांनी केले.