न्यायमंदिर परिसरात रानडुकरांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:41 AM2017-10-08T00:41:13+5:302017-10-08T00:41:23+5:30
मागील कही महिन्यांपासून रानडुकरांचे वास्तव्य शहराला लागून असलेल्या परिसरात आहे. अनेकांना दररोज विनोबा नगर व गोवर्धन नगरात रानडुक्कर फिरताना दिसतात.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मागील कही महिन्यांपासून रानडुकरांचे वास्तव्य शहराला लागून असलेल्या परिसरात आहे. अनेकांना दररोज विनोबा नगर व गोवर्धन नगरात रानडुक्कर फिरताना दिसतात. गोवर्धन नगरात न्यायालयाची इमारत आहे. इमारत परिसरातच न्यायाधीशांकरिता सदनिकेची कामे सुरु आहेत. सध्या रानडुकरांनी आपला मोर्चा या सदनिकेत वळविला आहे. न्यायालय परिसरात दिवसभर शेकडो जणांची वर्दळ असते. वनविभागाचे कायम येथे दुर्लक्ष दिसत आहे.
तुमसर शहरातील गोवर्धन नगर, विनोबा नगरातील रिकाम्या शेतशिवार असून तुरळक घर आहेत. नवीन वस्तीत घरे दूर दूर आहेत. रिकाम्या भूखंडावर झुडपी जंगल तयार झाले आहे. हनुमान तलाव व त्या समोरील रिकाम्या जागेवर लहान खुरटी झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. रानडुकरांनी या झुडपी जंगलात आपले सुरक्षित निवासस्थान तयार केले आहे. संध्याकाळी व पहाटे सर्वसामान्यांना रानडुकरांचा कळप येथे सहज पाहायला मिळतो. तामसवाडी मार्गपरिसर व गोवर्धन नगरातील घरासमोर रानडुक्कर सहज फिरताना दिसतात. सकाळी ८ ते ८.३० पर्यंत नागरिकांना रानडुकरांचे दर्शन झाले आहेत.
तालुकास्तरीय न्यायालयाची इमारत विनोबा भावे मार्गावर आहे. न्यायालयाचा परिसर मोठा आहे. मुख्य न्यायालयीन इमारत व त्या बाजूस न्यायाधीश तथा कार्यालयीन कर्मचाºयाकरिता इमारतीचे बांधकाम सध्या सुरु आहे.
नवनिर्मित इमारत परिसरात झुडपी जंगल तयार झाले आहे. या झुडूपात व इमारत परिसरात रानडुकरांनी आपला ठिय्या तयार केला आहे. सुरक्षित स्थळ, मानवी वर्दळ या ठिकाणी नसल्याने रानडुक्कर येथे सहज प्रवेश करतात. दिवसभर न्यायालयात मोठी गर्दी असते. येथे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाचे मात्र येथे कायम दुर्लक्ष दिसत आहे. झुडपी जंगलामध्येच रानडुक्कर पुन्हा जंगलात जाण्याची शक्यता कमीच आहे.
विनोबा भावे बायपास रस्त्यावरून रात्री जाणे सध्या धोकादायक ठरत आहे. शहराबाहेर हा मार्ग असला तरी रात्री या मार्गावर वाहतूक सुरुच असते. न्यायालय परिसर असूनही सुरक्षेकरिता वनविभाग येथे गंभीर दिसत नाही. अपघात तथा दुर्घटनेनंतर येथे वनविभागाला जाग येईल काय? हाच मुख्य प्रश्न आहे.
न्यायालय परिसरात झुडपी जंगलवजा झाडे असून तिथे मोकळी वाट आहे. येथे रानडुकरांचे वास्तव्य असू शकते. न्यायालय प्रशासनाने स्वच्छता केली होती. पुन्हा येथे लक्ष घालण्यात येईल.
-अरविंद जोशी,
वनपरिक्षेत्र अधिकारी, तुमसर.