टेकडीच्या मालकीबाबत कलगीतुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:10 PM2018-07-22T22:10:38+5:302018-07-22T22:10:56+5:30
कित्येक दिवसांपासून साकोली ते गडकुंभली मार्गावर असलेल्या टेकडीचे जेसीबीच्या सहाय्याने अवैधरित्या खनन सुरु आहे. या खननामुळे जलशुध्दीकरण केंद्राला धोका निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. यावर वनविभाग व महसूल विभागात टेकडीच्या मालकीबाबत कलगीतुरा सुरु झाला असून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात येत आहे.
संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : कित्येक दिवसांपासून साकोली ते गडकुंभली मार्गावर असलेल्या टेकडीचे जेसीबीच्या सहाय्याने अवैधरित्या खनन सुरु आहे. या खननामुळे जलशुध्दीकरण केंद्राला धोका निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. यावर वनविभाग व महसूल विभागात टेकडीच्या मालकीबाबत कलगीतुरा सुरु झाला असून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात येत आहे.
तालुक्यातील गौण खनिजांची देखरेख तथा मालकी कुणाची आहे, असा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे. वनविभाग व महसूल विभाग यांच्या मते अवैधरित्या खणन सुरु असलेली टेकडी क्षेत्र आमच्या विभागांतर्गत येत नाही. मग या टेकडीची मालकी कुणाची? असा प्रश्न उपस्थित झाल्याने या टेकडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
या टेकडीवर वनविभागाचे विश्रामगृह असून त्याच्या खालील बाजूला वनविभागाची नर्सरी आहे. ज्यावेळी जलशुध्दीकरण योजना तयार करण्यात आली. त्यावेळी या जागेसाठी वनविभागाची परवानगी घेण्यात आली होती, हे विशेष. वनविभागाच्या माहितीनुसार गट क्रमांक ४०६/अ/१ च्या सिमेनंतर टीसीएम नाली खोदण्यात आली आहे. सदर खोदकाम हे नालीच्या बाहेरुन आहे. उल्लेखनीय म्हणजे राज्य शासनाच्या हद्दीत असलेली संपूर्ण मालमत्ता त्या राज्याची असते. परंतु महसुल विभाग या टेकडीच्या मालकीबाबद हक्क का दाखवित नाही. हाच खरा प्रश्न आहे. दुसरीकडे जलशुध्दीकरण केंद्र ते गडकुंभलीपर्यंत अवैध खणन होत असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे महसुल बुडत आहेत. या नुकसानीला जबाबदार कोण? हा प्रश्नही अनुत्त्तरीत आहे.