परंपरेचा वारसा सांभाळत कुंभारपुऱ्यात घरोघरी साकारतोय कान्होबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:34 AM2021-08-29T04:34:07+5:302021-08-29T04:34:07+5:30
पालांदूर : श्रावणमास म्हटला की सण-उत्सवांची रेलचेल. श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव श्रावणमासातील महत्त्वपूर्ण सण. महाभारतातील मुख्य सूत्रधार असलेले श्रीकृष्ण यांचा ...
पालांदूर : श्रावणमास म्हटला की सण-उत्सवांची रेलचेल. श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव श्रावणमासातील महत्त्वपूर्ण सण. महाभारतातील मुख्य सूत्रधार असलेले श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावणमासात येतो. पालांदूर येथील कुंभारपुऱ्यात परंपरेचा वारसा सांभाळत घरोघरी नटखट श्रीकृष्णाची अर्थात कोन्होबाच्या मूर्ती घडविण्याचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. कोरोना व महागाईचा फटका मूर्तिकारांना बसत आहे. मात्र दीड दिवसाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे.
लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे २५ ते ३० कुंभार परिवार आहेत. जेमतेम परिस्थितीत जीवन जगत आहेत. वर्षभर गावातीलच मातीला चाकावर आकार देत पोट भरण्याचे जीवनचक्र सुरू आहे. अगदी लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत घरची सगळीच मंडळी मूर्ती घडविण्यात व रंग देण्यात तरबेज आहेत. गणपती असो की दुर्गादेवी हुबेहूब मूर्ती तयार करण्याच्या त्यांच्या कलेला तोड नाही. श्रीकृष्णाची मूर्ती तर अगदी हुबेहूब तयार केली जाते. जणू साक्षात श्रीकृष्ण घरी आल्याचा भास होतो. रेखाटलेली मूर्ती नजरेचे पारणे फेडणारी ठरते. मूर्तिकारांचे अर्थात कुंभार बांधवांचे कितीही कौतुक केले तरी कमी पडत आहे. मूर्तिकार संजय पाठक, सागर पाथरे, धनराज पाथरे, दीपक ठाकरे, मोरेश्वर पाथरे आदी साेमवारी जन्माष्टमी असल्याने मूर्तीवर अखेरचा हात फिरवित आहेत.
दाेन वर्षापासून कोरोना आणि महागाईने मूर्तिकारांवर संकट आले आहे. मागणी कमी झाल्याने मूर्ती तयार करणे परवडत नाही. मात्र काही भाविक मूर्ती घेताना मोल-भाव करतात. त्यामुळे संकटातही स्वतःची कला जपत आहेत, हे मात्र विशेष!
बाॅक्स
दीड दिवसाचा पाहुणा
दीड दिवसाचा पाहुणा म्हणून भगवान श्रीकृष्ण भक्तांच्या घरी विराजमान होतो. दीड दिवसात त्याची मनोभावे पूजाअर्चा केली जाते. श्रीकृष्णाचे बालपण, यशोदा माता, कालियामर्दन आदीसह श्रीकृष्णाच्या लीला सांगितल्या जातात. सोमवारी श्रीकृष्णाची घरोघरी स्थापना होऊन पूजाअर्चा केली जाणार आहे.