सरपंच मानधनातून कन्यारत्न पुस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:07 AM2019-08-29T00:07:25+5:302019-08-29T00:08:06+5:30
भाऊबिजेच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत त्यांनी वर्षभरात कन्यारत्न जन्माला घातलेल्या महिलांना साडी-चोळीची भेट दिली. मान्यवरांचे हस्ते सत्कार केला. तसेच वर्ग १० ते १२ वीत प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा थेट रक्कम देऊन गौरव केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : करडीचे सरपंच महेंद्र शेंडे यांनी मागील वर्षीपासून त्यांना मिळणाऱ्या सरपंच मानधनातून कन्यारत्न व गुणवंत विद्यार्थी पुरस्काराची सुरूवात केली. त्याचाच भाग म्हणून भाऊबिजेच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत त्यांनी वर्षभरात कन्यारत्न जन्माला घातलेल्या महिलांना साडी-चोळीची भेट दिली. मान्यवरांचे हस्ते सत्कार केला. तसेच वर्ग १० ते १२ वीत प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा थेट रक्कम देऊन गौरव केला.
या गौरवाने महिला भारावल्या. आपल्या सरपंच भावाची भेट आमच्यासाठी अनमोल असल्याचा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या. करडीचे सरपंच महेंद्र शेंडे यांना मागील वर्षी त्यांना मिळणाºया सरपंच मानधनातून कन्यारत्न व गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण करण्याची घोषणा केली होती. त्याचाच भाग म्हणून यावर्षी सरपंच महेंद्र शेंडे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते १ जानेवारी २०१९ पासून जन्मास आलेल्या मुलींच्या मातेला कन्यारत्न पुरस्कार, तर जिल्हा परिषद कनिष्ठ कला तथा कला व वाणिज्य महाविद्यालयातील वर्ग १० व १२ वी आर्टस, कॉमर्स व विज्ञान शाखेतून प्रथम व द्वितीय आलेल्या प्रतिभावंतास नगदी रक्कम व प्रशस्तीपत्राचे वितरण केले. भाऊबिजेच्या दिवशी आयोजित ग्रामसभेत साडी चोळी व पुरस्काराचे वितरण करण्यात आल्याने अनेक महिलांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी उपसरपंच गौरीशंकर सिंदपुरे, मंगेश साठवणे, माधुरी इलमे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष वामन राऊत, भाष्कर गाढवे, हेमंत भडके, अजय तितिरमारे, अमोल डोहळे, वैशाली सेलोकर, ज्योती साठवणे, अनुप्रिया सार्वे, हर्षा तितिरमारे, जयश्री शहारे, सुश्मा नारनवरे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने महिला व पुरूष मंडळी उपस्थित होती. यावेळी सरपंच महेंद्र शेंडे म्हणाले, उपसरपंच त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य तर सध्या थेट निवडणुकीतून सरपंच म्हणून गावाचा काम काज सांभाळीत आहे.
अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, जनजागृती कार्यक्रम, पर्यावरण संरक्षणासाठी कार्य केलीत. सरपंचांना फार मोठे मानधन मिळत नसले तरी मिळणारे मानधन हे लोकांचे आहे. त्याचा वापर लोकांसाठी केला पाहिजे या भावनेतूनच कन्यारत्न पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पुरस्काराची घोषणा केली. जनकल्याण हेच माझे कल्याण असल्याची भावना त्यांनी पुरस्काराचे वितरण करताना त्यांनी व्यक्त केली.