करचखेडा उपसा सिंचनाचे कालवे झाले शोभेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:36 AM2021-07-27T04:36:53+5:302021-07-27T04:36:53+5:30
शेतीला बारमाही सिंचनाची सोय होईल, या उद्देशाने करचखेडा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेंतर्गत आमगाव परिसरामध्ये आमगाव, ...
शेतीला बारमाही सिंचनाची सोय होईल, या उद्देशाने करचखेडा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेंतर्गत आमगाव परिसरामध्ये आमगाव, दिघोरी, टेकेपार, धारगाव, डोडमाझरी, पलाडी आदी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी नहरासाठी भूसंपादित करण्यात आले आहे. नहराचे खोदकाम करण्यात आले; मात्र या नहराला पाणीच येत नसल्याने शोभेची वास्तू ठरत आहे. या उपसा सिंचन अंतर्गत धारगावपर्यंत करण्यात आलेले नहराचे काम थातूरमातूर करण्यात आले आहे. कुठे खोल तर कुठे उथळ करण्यात आले; तसेच या नहरावर तयार करण्यात आलेले मोरीचे बांधकाम योग्य प्रमाणात करण्यात आले नाही. मोऱ्यांची उंची नहराच्या पाळीच्या बरोबरच ठेवण्यात आली, तसेच पाणी सोडणारे गेट यांची उंची नहराच्या पाळीपेक्षा कमी करण्यात आली, तसेच नहराच्या पाळीवर कमी प्रमाणात मुरूम घातला असून, एका वर्षातच नहराच्या पाळीवर चिखल तयार झालाय. त्यामुळे येथून शेतकऱ्यांना जाणे-येणे करायला फार त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे या नहराची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.