कारधा पूल बुडाला, वैनगंगा धोक्याची पातळी ओलांडून दीड मीटरवर
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: September 16, 2023 11:14 AM2023-09-16T11:14:25+5:302023-09-16T11:14:47+5:30
पाण्याची पातळी वाढतच असल्याने सखल भागातील बाधित गावकऱ्यांना आणि नागरिकांना प्रशासनाने स्थलांतरीत करण्याचे काम सुरू केले आहे.
भंडारा : वैनगंगा नदी रात्री दीड वाजतापासून धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहे. भंडारा शहरालगतचा कारधा पूल पाण्याखाली गेला असून या पुलावरील धोक्याी पातळी ओलांडून दीड मिटर पाणी वाहात आहे. यामुळे वहनगंगेच्या काठावरील गावांमध्ये पुराची स्थिती निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. पाण्याची पातळी वाढतच असल्याने सखल भागातील बाधित गावकऱ्यांना आणि नागरिकांना प्रशासनाने स्थलांतरीत करण्याचे काम सुरू केले आहे.
सलग दोन दिवस पाऊस झाला. यामुळे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पाण्याची पातळी वाढतच असल्याने गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे दीड मिटरने उघडण्यात आले आहेत. १६,४८९.६९ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पलिकडील भागात पुराची स्थिती निर्मण झाली आहे. पवनी तालुक्यातील काही ग्रामीण मार्ग बंद पडले आहेत.
संजय सरोवरचे ५ गेट सुरू
मध्यप्रदेशातील संजय सरोवरचे पाच गेट सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे सायंकाळपर्यंत पुन्हा पाण्याची पातळी वाढण्याची शक्यत आहे. धापेवाडा धरणांतून मागील १२ तासांपासून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कारधा पुलावर सकाळी १०:३० वाजता पाण्याची पातळी २४६.५० मिटर नोंदविण्यात आली आहे.
मार्ग बंद
जिल्हा प्रशासनाने निलेल्या महितुनुसार, पवनी तालुक्यातील गुडेगाव, उमरी, जुनोना, माहुली, रेवनी ते कोदुर्ला हे मार्ग बंद पडले आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा ते सुकळी, मांढळ ते सुकळी, महालगाव ते मोरगाव हे मार्ग बंद पडले आहेत. तुमसर तालुक्यातील तुमसर ते येवली, पिपरा आणि तामसवाडी ते उमरगाव हे मार्गही पुलावरून तीन ते चार फुट पाणी असल्याने बंद आहेत.
१० कुटूंब स्थलांतरीत
पुराची स्थिती आणी वाढता जलस्तर लक्षात घेता, भंडारा शहतालगतच्या गणेशपूर येथील ४ कुटूंब स्थलांतरित करण्यात आले आहेत. तसेच, भंडारा शहरातील ग्रामसेवक कॉलनीतील २ आणि कारधा गावातील ४ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात तेथील ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आले आहे. या सोबत, शहरातील टप्पा मोहल्ला, मेंढा, गणेशपूर, सागर तलावच्या मागचा भाग येथील येथील लोकांनाही विस्थापित केले जात आहे.