मानवी हस्तक्षेपामुळे ‘करकोच’ धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:39+5:302021-07-05T04:22:39+5:30

अर्जुनी मोरगाव : नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात बहुसंख्येने दिसणाऱ्या उघड्या चोचीचा करकोचांची संख्या हल्ली रोडावलेली दिसून ...

‘Karkoch’ in danger due to human intervention | मानवी हस्तक्षेपामुळे ‘करकोच’ धोक्यात

मानवी हस्तक्षेपामुळे ‘करकोच’ धोक्यात

Next

अर्जुनी मोरगाव : नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात बहुसंख्येने दिसणाऱ्या उघड्या चोचीचा करकोचांची संख्या हल्ली रोडावलेली दिसून येत आहे. करकोचा व इतर पक्ष्यांच्या खाद्यांना मानवाने आपले खाद्यान्न बनविल्याने पक्षी पाठ फिरवत आहेत. प्रकृती नेचर फाउंडेशनने यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान वसाहत संकुल परिसरात निसर्गरम्य तलाव आहे. हा तलाव विस्तीर्ण आहे. तलावाच्या काठावर अनेक गावे वसली आहेत. तलावात विविध प्रकारच्या वनस्पती व जैवविविधतेच्या आकर्षणामुळे देशी व विदेशी पक्षी येथे मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळेच या तलावाची ‘पक्ष्यांचे माहेरघर’ म्हणून सर्वदूर ओळख आहे. हिवाळ्यात येथे दरवर्षी सुमारे चार महिने विदेशी पक्षी मोठ्या संख्येने हमखास दिसून येतात. तलाव व लगतच्या अधिवासात करकोचा पक्ष्यांचे कवचयुक्त गोगलगाय (ग्रामीण भाषेत घोगोला) हे खाद्य मुबलक प्रमाणात आहेत. हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे. त्यामुळे या पक्ष्याला घोघोलेफोड या नावाने स्थानिक परिसरात ओळखले जाते. या खाद्याच्या आकर्षणामुळे करकोचा पक्ष्यांची संख्या या तलावावर मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. परंतु मानवी हस्तक्षेपामुळे नवेगाव बांध परिसरातील लोक भाजी बनविण्याकरिता घोघोले जमा करतात. यामुळे दिवसेंदिवस खाद्य अपुरे पडल्यामुळे उघड्या चोचीचा करकोचा हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे जैवविविधतेने नटलेला निसर्गरम्य परिसर आहे.

या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी दरवर्षी येतात. या विविध प्रजातींच्या पक्ष्यांना बघण्याकरिता आणि त्यांचा अभ्यास करण्याकरिता अनेक पर्यटक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने येतात. या परिसरात करकोचा पक्ष्यांची घरटी मानवी हस्तक्षेपामुळे दिसेनाशी झाली आहेत. येथील स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येतसुद्धा अलीकडे घट झाल्याचे दिसून आले आहे.

जैवविविधता आणि नवेगाव बांधच्या समृद्धीमध्ये या पक्ष्याचे मोलाचे योगदान आहे. या पक्ष्यांच्या संख्येत होणारी घट बघता या पक्ष्याचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

संवर्धनासाठी एक पाऊल.....

उघड्या चोचीचा करकोचा हे पक्षी नवेगाव बांधच्या तलावावर मोठ्या संख्येत दिसून येत होते. हल्ली त्यांची संख्या रोडावली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे त्यांच्या खाद्यावर आक्रमण होत असल्याने काळाच्या ओघात हा पक्षी नामशेष होण्याची भीती आहे. या पक्ष्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने घोघोले जमा करणाऱ्या लोकांवर वेळीच बंधने घालणे आवश्यक आहे. यासंदर्भात वन विभागाचे अधिकारी विजय धांडे, वाघ, दादा राऊत यांना प्रकृती नेचर फाउंडेशनने निवेदन दिले आहे. फाउंडेशनतर्फे नवेगाव बांध, धाबेपवनी, कोहलगाव ग्रामपंचायत तसेच मत्स्य व्यवसाय संस्थांना निवेदन देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे डॉ. गोपाल पालिवाल, डॉ. शरद मेश्राम, प्रा. अजय राऊत व बाळकृष्ण कुंभरे उपस्थित होते. फाउंडेशनने करकोचा संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

Web Title: ‘Karkoch’ in danger due to human intervention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.