बावनथडी प्रकल्पाचा कारली-चिचोली कालवा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:00 AM2020-05-07T05:00:00+5:302020-05-07T05:00:45+5:30
कारली-चिचोली वितरिकेवरून कारली, झनडीटोला, जोगेवाडा, चिचोली आदी शेतशिवारातील उन्हाळी धानाला जानेवारीपासून पाणी मिळत आहे. सध्या धान ओंबीवर आला असल्याने पाण्याची आवश्यकता आहे. मात्र आता कालवा फुटून पाणी नाल्यातून वाहून जात आहे. त्यामुळे धानाला पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. वेळेत दुरुस्ती झाली नाही तर संपूर्ण धानपिक धोक्यात येण्याची शक्यता आहे.
तुळशीदास रावते।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पांतर्गत कारली-चिचोली कालवा फुटून संपूर्ण पाणी नाल्यात वाहून जात आहे. दुसरीकडे पाणी मिळणार नसल्याने धान पीक वाळण्याची भीती आहे. या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कारली-चिचोली वितरिकेवरून कारली, झनडीटोला, जोगेवाडा, चिचोली आदी शेतशिवारातील उन्हाळी धानाला जानेवारीपासून पाणी मिळत आहे. सध्या धान ओंबीवर आला असल्याने पाण्याची आवश्यकता आहे. मात्र आता कालवा फुटून पाणी नाल्यातून वाहून जात आहे. त्यामुळे धानाला पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. वेळेत दुरुस्ती झाली नाही तर संपूर्ण धानपिक धोक्यात येण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्याने कालवा ओव्हरटॅक होऊन फुटला असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
कोरोना संकटाच्या लॉकडाऊनमुळे आधीच शेतकरी डबघाईस आला आहे. आता धानाला पाणी मिळाले नाही तर उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. या कालव्यावर शेकडो एकर ओलीत केले जाते. परंतु आता हे पीक धोक्यात आले आहे. कालवा फुटल्याने नैसर्गिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडाला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन तात्काळ कालवा पूर्ववत करावा अशी मागणी आहे.
बघेडाच्या सरपंच प्रतिमा ठाकूर म्हणाल्या, सिंचन विभागाच्या निष्काळजीपणामुळे क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे हा कालवा फुटला. शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठी ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी. २० मे पर्यंत सिंचनासाठी पाणी सोडावे असे त्यांनी सांगितले. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.हरेंद्र राहांगडाले म्हणाले, कालवा फुटल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. दुसरीकडे पाण्याअभावी शेतकºयांचा धान धोक्यात आला आहे. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करावी.
बावनथडी प्रकल्पाचे पाणी पहिल्यांदाच जोगीवाडा परिसराला मिळत आहे. काही कारणास्तव कालवा फुटला त्याची तात्काळ दुरुस्ती केल्या जाईल.
-एल.डी. सिंग,
सहाय्यक अभियंता, तुमसर.