काशीबाई म्हणते, घर देता का... घर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 10:00 PM2019-05-12T22:00:51+5:302019-05-12T22:01:54+5:30
खिळखिळे झालेले मातीचे घर. वादळ-वाऱ्यात केव्हा कोसळेल याचा नेम नाही. साधी वाºयाची झुळुकही आली तरी अंगावर काटा उभा राहतो. अशा तडे गेलेल्या घरात एक वृध्द महिला गत काही वर्षांपासून नाईलाजाने वास्तव्यास आहे. शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत अर्जही केला.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : खिळखिळे झालेले मातीचे घर. वादळ-वाऱ्यात केव्हा कोसळेल याचा नेम नाही. साधी वाºयाची झुळुकही आली तरी अंगावर काटा उभा राहतो. अशा तडे गेलेल्या घरात एक वृध्द महिला गत काही वर्षांपासून नाईलाजाने वास्तव्यास आहे. शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत अर्जही केला. परंतू दोन वर्षांपासून प्रतीक्षा कायम आहे. आता दिव्यांग वृध्द महिला घर देता का... घर! अशी आर्त विणवनी करीत आहे.
ही कहाणी आहे तुमसर तालुक्यातील माडगी येथील काशीबाई संतोष कुंडलीक या ७५ वर्षीय वृध्द महिलेची. आपल्या धनराज नावाच्या मुलासोबत ती या झोपडीत राहते. काशीबाई दिव्यांग असल्याने धनराजच्या भरोश्यावर तिचा चरितार्थ चालतो. गत ५० वर्षांपासून कुंडलिक कुटूंब माडगीत वास्तव्याला आहे. पंरतू अद्यापही हक्काचे घर मात्र मिळाले नाही. घराच्या प्रतीक्षेत काशीबाईचे पती संतोष यांचा मृत्यू झाला.
पंतप्रधान घरकूल योजनेमुळे आपल्या घराचे स्वप्न होईल, असे काशीबाईला वाटते. त्यासाठी त्यांनी मुलाच्या मदतीने संपुर्ण कागदपत्रे जमा केली. ग्रामपंचायत व संबंधित एजन्सीकडे अर्ज दिला. परंतू घरकुलाचा अद्यापपर्यंत थांगपत्ता नाही. मागेल त्याला घर देण्याची शासनाची योजना आहे. प्रत्येकाला घरकूल देण्याचा शासनाच्या मानस आहे, असे असतानाही दिव्यांग काशीबाई मात्र घरासाठी प्रतीक्षा करीत आहे. मातीचे असलेले घर गतवर्षीच्या वादळात उध्दवस्त झाले होते. उडालेले छप्पर पैसे जमवून प्लास्टिक ताडपत्रीने अच्छादीत केले. मातीच्या घराला तडे गेले आहे. वादळात घर कोसळते की काय अशी भीती असते. या पावसाळ्यापूर्वीतरी आम्हाला हक्काचे घर मिळेल काय, अशी विनवणी काशीबाई करते.
काय करावे काही सुचत नाही
शासनाकडे घरकुलासाठी अर्ज देवूनही उपयोग झाला नाही. या पावसाळ्यात माझी झोपडी वाचेल काय? आकाशात काळे ढग जमा झाले की मन घाबरुन जाते व काय करावे सुचत नाही. मायबाप सरकारने पावसाळ्यापूर्वी घरकूल मंजूर करावे अशी मागणी काशीबाई करीत आहे.
प्रत्येकाला घर योजनेचा फज्जा उडाला आहे. दिव्यांग वृध्द महिलेला घरकुलासाठी दारोदारी भटकावे लागते. ही लाजीरवाणी बाब आहे. प्रशासनाला खंत कशी वाटत नाही.
- विपील कुंभारे
काँग्रेस नेते, माडगी