विदर्भाची काशी पवनी : ऋषीपंचमीला महिलांनी केली पूजा-अर्चना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 12:47 PM2024-09-09T12:47:03+5:302024-09-09T12:47:36+5:30

Bhandara : वैजेश्वर घाटावर पवित्र स्नानासाठी गर्दी

Kashi Pavani of Vidarbha: Women worship on Rishipanchami | विदर्भाची काशी पवनी : ऋषीपंचमीला महिलांनी केली पूजा-अर्चना

Kashi Pavani of Vidarbha: Women worship on Rishipanchami

लोकमत न्यूज नेटवर्क 
सावरला :
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवनी शहराच्या वैजेश्वर घाटावर दरवर्षीप्रमाणे यंदाही ऋषीपंचमीला पवित्र स्नान व पूजा- अर्चनेसाठी लाखो भाविक महिलांची गर्दी उसळली होती. पालिका प्रशासन व पोलिसांनी सुव्यवस्था राखली होती.


ऋषीपंचमी हा उत्सव भाद्रपद महिन्यातील हरितालिका पूजनानंतर चतुर्थीला गणेश पूजनाने साजरा केला जातो. भाद्रपद पंचमी ही ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील व्रतवैकल्यामुळे ऋषीपंचमीचे व्रत महिला मोठ्या संख्येने करीत असतात. त्यामुळे विदर्भासह अन्य राज्यातील भाविक महिला पवित्र स्नानासाठी पवनी येथे दाखल होतात. 


नागरिकांची दाटी व वाहनाची गर्दी यामुळे नदी घाट परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने व्यापक सुविधा पुरविण्यात आल्या. स्थानिक प्रशासन स्थितीवर लक्ष ठेवून होते. पोलिस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवून होमगार्ड, पुरुष व महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. 


नगरपालिकेच्या वतीने पिण्याचे स्वच्छ पाणी व स्वच्छता याविषयी काळजी घेण्यात आली. ग्रामीण रुग्णालय पवनीच्या वतीने बीपी शुगर तपासणी व अन्य आरोग्य सुविधा मोफत पुरविण्यात आल्या. अत्यावश्यक व तातडीचे उपचार मोफत पुरविण्यात आले. पवनी तहसील कार्यालयाच्या वतीने मतदान जनजागृती, ई-पीक जनजागृती व बोटिंगची उत्तम सुविधा पुरविण्यात आली. स्वतः नायब तहसीलदार धुर्वे लक्ष ठेवून होते. 


मंडप व भोजन सुविधा 
वैजेश्वर पंच कमेटीमार्फत मंडप व सुरक्षेकरिता मनुष्यबळ पुरविण्यात आले. तसेच भाविकांच्या भोजनासाठी सुविधा पुरविण्यात आली. यासाठी कमिटीचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळाचे सहकार्य लाभले. यात पंचकमिटीचे अध्यक्ष भास्कर उरकुडकर, सचिव महादेव लिचडे, राजेश येलशेट्टीवार, राजू चोपकर, मनोहर लिचडे, मनोहर खडगी व अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.


आंभोरा नदीघाटावर वाहनांची कोंडी 
पहेला आंभोरा येथील वैनगंगेच्या घाटावर हजारो महिला भाविकांनी पवित्र स्नानासाठी गर्दी केली. मात्र भंडाराकडून जाणाऱ्या मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने रस्ता जाम झाला. त्यामुळे पोलिसांनी नवरगाव येथेच भाविकांची वाहने थांबविली. अखेर नाईलाजाने जांब व नवरगाव येथील नदीपात्रातील घाटावर महिलांनी स्नान करुन पूजाविधी केली. नागपूरकडून येणाऱ्या मार्गावर संख्या अधिक होती तर भंडाराकडून सुमारे अडीच हजारावर भाविकांची गर्दी होती. यामुळे अनेकांची गैरसोय झाली होती.

Web Title: Kashi Pavani of Vidarbha: Women worship on Rishipanchami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.