कटंगी-तुमसर रोड प्रवासी गाडी सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:40 AM2021-09-23T04:40:14+5:302021-09-23T04:40:14+5:30
तुमसर : कोरोना संक्रमण काळात गत दीड वर्षापासून तिरोडी-तुमसर रोड रेल्वे प्रवासी गाडी बंद आहे. दरम्यान, तिरोडी ते कटंगी ...
तुमसर : कोरोना संक्रमण काळात गत दीड वर्षापासून तिरोडी-तुमसर रोड रेल्वे प्रवासी गाडी बंद आहे. दरम्यान, तिरोडी ते कटंगी नवीन रेल्वे ट्रॅकचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु प्रवासी गाडी सुरू झाली नाही. यासंदर्भात बालाघाटचे खासदार ढालसिंग बिसेन यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. रेल्वेमंत्र्यांनी बिलासपूर येथील दक्षिण पूर्व रेल्वेचे महाव्यवस्थापकांना यासंदर्भात निर्देश दिले. त्यामुळे ही गाडी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मध्य प्रदेशाला थेट जोडणारी तुमसर-तिरोडी ही महत्त्वपूर्ण रेल्वे प्रवासी गाडी गत दीड वर्षापासून बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. खासगी बसगाड्या या मार्गावर मोठ्या संख्येने धावत असून, त्यांनी बस भाडे दुप्पट वाढवलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. मध्य प्रदेशातील तिरोडी-पटांगे-वारासिवनी-बालाघाट येथील नागरिकांचा संपर्क नागपूर व भंडारा जिल्ह्याशी येतो. परंतु प्रवासी गाडी बंद असल्यामुळे नागरिकांना बसगाड्यांच्या आधार घ्यावा लागतो. बालाघाटचे खासदार बिसेन यांना स्थानिक नागरिकांनी भेटून समस्या सांगितली. त्यावर खा. बिसेन यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून कटंगी - तुमसर रोड रेल्वे प्रवासी गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बिलासपूर रेल्वे महाव्यवस्थापक यांना संबंधित मार्गावर प्रवासी रेल्वे गाडी सुरू करण्याचे निर्देश दिले. रेल्वे महाव्यवस्थापकांनी नागपूर येथील विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांशी चर्चा करून सदर प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले. येत्या काही दिवसांत तुमसर रोड कटंगी दरम्यान रेल्वे प्रवासी गाडी सुरू होणार आहे.
बॉक्स
बालाघाट-तुमसर रोड प्रवासी गाडी सुरू होणार
तिरोडी-गोबरवाही रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर नायडू यांनी खासदार ढालसिंग बिसेन यांना बालाघाट तुमसर रोड प्रवासी रेल्वे गाडी सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. दरम्यान, ही गाडी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय इस्पात राज्य मंत्री फाल्गुन कुलस्ते यांनी जबलपूर, नागपूर, भोपाळ, तुमसर रोड, गोंदियापर्यंत प्रवासी रेल्वे सुरू होण्याचे संकेत दिल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर नायडू यांनी दिले. तिरोडी, शिकला, डोंगरी बालाघाट, वारासिवनी, कटंगी येथे मॅग्नीज खाणी असून, या खाणीत जबलपूर, छत्तीसगड राज्यातील हजारो मजूर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे ये-जा सुरू असते. या गाड्या सुरू झाल्याने खाण मजूर व सामान्य नागरिकांना मध्य प्रदेशात जाण्याकरिता सोयीचे ठरणार आहे.