काटेखाये, भेंडारकर, धुर्वे, शिवणकर, हलमारे विजयी
By admin | Published: June 27, 2016 12:32 AM2016-06-27T00:32:18+5:302016-06-27T00:32:18+5:30
सहकार क्षेत्रातील जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक रविवारी मिशन हायस्कूलमध्ये पार पडली
निवडणूक दुग्ध संघाची : आता नजरा अध्यक्ष निवडीकडे
भंडारा : सहकार क्षेत्रातील जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक रविवारी मिशन हायस्कूलमध्ये पार पडली. निवडणुकीत यापूर्वी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात संचालक अविरोध निवडून आले होते. यात रामलाल चौधरी, विनायक बुरडे, सदाशिव वलथरे, आशिष पातरे, लक्ष्मीकांत सेलोकर, महेंद्र गडकरी, राम गाजीमवार या सदस्यांचा समावेश होता़ दोन महिला संचालक पदासाठी तीन महिला रिंगणात होत्या.
ज्यामध्ये महिला प्रवर्गातून रिता हलमारे यांनी १९२ व अनिता साठवणे यांनी १८८ मत प्राप्त केले़ सेलोकर या निवडणुकीतून माघार घेतली होती.
या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अध्यक्ष विलास काटेखाये हे पवनी तालुक्यातून रिंगणात होते. निवणडूकीत त्यांना ३४ मत प्राप्त झाले असून त्यांचाच या निवडणुकीत वर्चस्व राहिले. त्यांचे प्रतिस्पर्धी हिरालाल खोब्रागडे यांना मात्र ३ मत प्राप्त झाले़
त्याचप्रकारे लाखांदुर तालुक्यातून गोपीचंद भेंडारकर व संतोष शिवणकर आमोरासमोर होते. यात शिवणकर यांना ९ व भेंडारकर यांना ७ मत प्राप्त झाले. शिवणकर यांना विजयी घोषित करण्यात आले.
ओबीसी प्रवगार्तुन क्रिष्णा अतकरी व नरेश धुर्वे हे एकमेकांविरुद्ध रिंगणात होते. यामध्ये धुर्वे यांना १४३ मत तर अतकरी यांना ७१ मत प्राप्त झाले़ यामध्ये धुर्वे यांचा विजय झाला.
महिला प्रवर्गातून रिता हलमारे यांनी १९२ मते घेऊन अनिता साठवणे यांचा चार मतांनी पराभव केला. एकूण १२ सदस्यांपैकी सात सदस्य अविरोध निवडून आल्यामुळे पाच जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली़
आजच्या निवडणूकनंतर सर्वांच्या नजरा आता अध्यक्षांच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत. सहकार क्षेत्रातील मानांकित समजल्या जाणाऱ्या दुग्ध संघाच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (प्रतिनिधी)